पुणे

गड्या, तुला थोडं सावरून वागावं लागेल! मंगलदास बांदल यांच्याबद्दल शिरूरमध्ये चर्चा

अमृता चौगुले

निमोणे; पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्याच्या राजकारणात कायम धुमाकूळ घालणारे जि. प.चे माजी सभापती मंगलदास बांदल यांची प्रदीर्घ काळानंतर नुकतीच कारागृहातून जामिनावर सुटका झाली. बांदलांनी काय उद्योग केले? हा न्यायप्रविष्ट विषय आहे. भविष्यात त्याची उत्तरे तालुक्याला मिळतीलही; मात्र मागील दहा-पंधरा वर्षांपासून राजकारणाच्या फडात बांदलांनी जो काही धुमाकूळ घातला, ती एक आख्यायिका बनून गेली आहे.

शिरूर तालुक्याच्या राजकारणात जे प्रमुख दोन-चार चेहरे आहेत, त्यामध्ये मंगलदास बांदलांनी आपले स्थान भक्कम केले आहे. मागील काही निवडणुकांत तर बांदलांनी अक्षरशः अनेक मातब्बरांना आपल्या बोटावर नाचविले. 'बांदल सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण' या न्यायाने अनेक ज्येष्ठ राजकारणी बांदलांच्या तालावर शिरूर तालुक्याच्या राजकारणात भूमिका वठवीत होते.

कारागृहात जाईपर्यंत बांदल यांचा नक्की पक्ष कोणता? हेच सांगणे अवघड होते. पहाटेच्या शपथविधीनंतर अज्ञातवासात गेलेल्या अजितदादांना भेटणार्‍या मोजक्या मंडळींत जसे बांदल होते, तसेच राज ठाकरे यांच्या व्यासपीठावरून चक्क राज ठाकरे यांना आपल्या वक्तृत्व शैलीने मोहित करणारेही बांदलच होते. सकाळी घड्याळ, दुपारी धनुष्यबाण, सायंकाळी हात, तर उत्तर रात्री कमळ, हे नित्याचे झाले होते. राज्यपातळीवरील सगळ्याच प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी सलोख्याचे संबंध असलेले बांदल स्थानिक पातळीवर मात्र कोणाचे? हा कायम संशोधनाचा विषय राहिला.

फर्डा वक्ता, मनी आणि मसल पॉवर दिमतीला असतानाही बांदल यांच्या राजकारणाला ज्या काही मर्यादा आल्या, त्याचे एक कारण बांदल सगळ्यांना गृहीत धरत गेले. मी सगळ्यांना खेळवतो, या भ्रमात राहिल्यामुळेच स्थानिक पातळीवर पक्षीय पाठबळ एकमुखी बांदलांना उभे करता आले नाही. बांदलांची स्वप्ने मोठी आहेत. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाहेर झेप घ्यायची असेल, तर निष्ठावंत कार्यकर्त्यांचे जाळे उभारावे लागेल. भूतकाळात केलेल्या चुका सुधारून भविष्यात वाटचाल करीत असताना दोन पावले मागेपुढे करण्याची वृत्ती बाळगावी लागेल.

मागील दहा-पाच वर्षांत उभ्या-आडव्या खेळ्या करून बांदलांनी शिरूर तालुक्याच्या राजकीय पटावर धुमाकूळ घातला. आज परिस्थिती बदलली आहे. दिवंगत माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या अकाली जाण्याने शिरूर तालुक्यात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बांदल यांचे पाठीराखे आणि जिल्हा बँकेचे माजी संचालक निवृत्तीअण्णा गवारी यांनी राजकारणातून जवळजवळ संन्यास घेतला आहे.

आमदारकीच्या स्वप्नाला गवसणी घालण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी नियोजनबद्ध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे अन् तब्बल वीस-एकवीस महिन्यांचा कारावास भोगून बांदल बाहेर आले आहेत. शिरूरच्या राजकारणाच्या पटावर बांदलांचा वावर असेल, तरच धुमाकूळ होतो, असा विश्वास असणार एक वर्ग तालुक्यात आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. मात्र, भविष्यात वाटचाल करताना बांदलांनी भूतकाळातील चुका सुधारून भूमिका घेतली, तर तालुक्याच्या राजकारणात बांदलांचा दबदबा कायम राहू शकतो, हे मात्र नक्की.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT