पुणे

पुणे : तळजाई…मोर, साप, ससे यांची आई; फुलपाखरू उद्यानाबरोबरच नक्षत्र वन

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: विविध प्रकारचे वृक्ष, वेली, विविध प्रकारच्या वनस्पती यामुळे पुणेकरांसाठी शुद्ध हवेचा पुरवठा करणारी फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणार्‍या टेकडीवर मोर, लांडोर, साप, ससे अशा विविध प्राण्यांचा अधिवास आहे. त्यामुळे ही तळजाई ही या वन्यजीवांची आईच ठरत आहे. या टेकडीवर निसर्ग – पर्यावरणपूरक झालेली तळजाईवरील कामे…. वृक्षलागवडीबरोबरच क्लीन हील कॅम्पेन अंतर्गत दर शनिवारी होणारी टेकडी स्वच्छ्ता मोहीम… बांबू वन, नक्षत्र वनाबरोबरच फुलपाखरू उद्यान अशा विविध गोष्टींचा खजिना तळजाईवर पाहण्यास मिळतो. शहराजवळचा हा हरित ठेवा पुणेकरांसाठी शुद्ध प्राणवायूचे फुफ्फुस आहे.

वन विभागाच्या वतीने अलीकडच्या काळात विविध प्रकल्प राबवून टेकडी हिरवीगार केली आहे. येथे पडणार्‍या पाण्याचा प्रत्येक थेंब मुरला जावा यासाठी जलसंधारणाची कामे करण्यात आली. वनतळे, सीसीटी, माती नालाबांध अशा प्रकारच्या जलसंधारणाच्या कामामुळे येथे वाहून जाणारे पाणी मूरत आहे. या कामाबरोबरच येथे छोटी-छोटी पाणवठे तयार करून टेकडीच्या अधिवासात असणार्‍या विविध प्राणी आणि पक्ष्यांसाठी पाण्याची सोयही करण्यात आली आहे.

साहजिकच या पाणवठ्यावर मोर, ससे, साप आणि अन्य सरपटणारे प्राण्यांचा वावर वाढत असल्याचे दिसून येत आहे. येथे येणार्‍या नागरिकांचा परिणाम या वन्य जीवाच्या अधिवासावर होऊ नये यासाठी पुणे वनविभागाकडून कृत्रिम पाणवठ्याची सोयीबरोबरच क्लीन हील कॅम्पेन अंतर्गत टेकडी स्वच्छ्ता मोहीमही राबविली जात आहे. तसेच विविध संस्थाकडून वृक्षारोपणचे उपक्रम राबविले जातात. याच तळजाईवर वन विभागाच्या वतीने नर्सरी देखील साकारलेली आहे. जलसंधारणची कामे केलेली आहेत.

हे आढळतात प्राणी…
टेकडीवर विविध प्रकारचे नैसर्गिक वनस्पती, विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आढळून येतात. यामध्ये प्रामुख्याने मोर, लांडोर, ससे, धामण प्रजातींचे साप, नाग, विषारी अथवा बिनविषारी सर्प यांचे प्रमाण अधिक आहे.

तळजाईवर आहेत हे वृक्ष…
काही दिवसांपूर्वी पुणे वनविभाकडून ग्रिलिसिडीया या प्रजातींचे निर्मूलन करून त्याजागी मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पिंपळ, वड, कदंब, बांबू व त्यांच्या विविध प्रजाती लावण्यात आलेल्या आहेत. यामधे बांबू वनउद्यानामध्ये मानवा, कटांग, मानवेल यासारखे बांबूंचे प्रकार आहेत.

SCROLL FOR NEXT