प्रशांत मैड
शिक्रापूर: पुणे जिल्हा परिषदेच्या गट व गण रचनेमध्ये राजकीयदृष्ट्या नेत्यांचे गाव म्हणून ओळख असणार्या तळेगाव ढमढेरे या एकाच गावाची चक्क दोन जिल्हा परिषद गटांत विभागणी झाली आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या प्रारूप गटरचनेमध्ये तळेगाव ढमढेरेचे मतदान हे शिक्रापूर जिल्हा परिषद गट व सणसवाडी जिल्हा परिषद गटांमध्ये विभागले गेले आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही अजब गटरचना असल्याचा येथील ग्रामस्थांनी दावा केला असून, अनेक हरकती या गावांमधून नोंदविण्यात येणार असल्याचे समजते. (Latest Pune News)
तळेगाव ढमढेरे येथील प्रभाग क्रमांक एकचा समावेश नव्याने तयार करण्यात आलेल्या सणसवाडी जिल्हा परिषद गटामध्ये करण्यात आला आहे. या प्रभागामध्ये सुमारे अडीच हजार मतदान आहे. तळेगाव ढमढेरे येथील उर्वरित प्रभाग क्रमांक दोन ते सहा असे एकूण पाच प्रभाग असून, यामध्ये सुमारे दहा हजार मतदान आहे.
या प्रभागांचा समावेश शिक्रापूर जिल्हा परिषद गटामध्ये करण्यात आला आहे. तळेगाव ढमढेरे गावचे मतदान एका गटात न ठेवता त्याची दोन ठिकाणी विभागणी करण्यात आली आहे. यामागे कोणाचा राजकीय स्वार्थ अथवा हस्तक्षेप आहे का, याची चर्चा येथील ग्रामस्थांपासून राजकीय नेत्यांमध्ये रंगली आहे. शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सर्वात मोठे मतदान असणारे गाव हे तळेगाव ढमढेरे आहे. सुमारे
13 हजार मतदान या गावाचे आहे. तालुक्याच्या राजकीय जडणघडणीमध्ये या गावाचे मोठे योगदान आहे. तालुक्यातील व जिल्ह्यातील सत्ता स्थानांची मोठे पदे येथील नेत्यांनी भूषविली आहेत. असे असतानाही मागील पंचवार्षिक निवडणुकीतील तळेगाव ढमढेरे येथील दोन्ही उमेदवार निवडून येऊ शकले नव्हते हे विशेष.
तळेगाव ढमढेरे गावाची विभागणी दोन जिल्हा परिषद गटात करणे हा मोठा विनोद आहे. यामागे गावचे राजकीय अस्तित्व संपवणे हा कट आहे. यावर आम्ही प्रशासनाकडे हरकती घेणार घेणार असून यासाठी आम्ही विशेष ग्रामसभा बोलविण्याचा आग्रह ग्रामपंचायतीला केला आहे- कैलास नरके, शिवसेना, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख