तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे एसटी आगारात पाच एसटी बसगाड्या दाखल करण्यात आल्या. मावळ तालुक्यातील नागरिकांना अधिक वेळेवर, सुरक्षित आणि सुटसुटीत सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने तळेगाव दाभाडे बस आगारात नव्याने दाखल झालेल्या पाच एसटी बसगाड्यांचे लोकार्पण आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते रविवारी (दि.१८) संपन्न झाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव दाभाडे एसटी डेपोचे व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे, वाहतूक निरीक्षक आकाश जगताप, हरीश कोकरे, प्रकाश हगवणे, विशाल काळोखे, शैलेश चव्हाण आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी लोकार्पणानंतर आगारातील विविध विभागांची पाहणी करत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मावळ तालुक्यासाठी नव्या बसगाड्यांची मागणी आमदार शेळके यांनी लेखी पत्राद्वारे केली होती. या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन विभागाने मावळ तालुक्याला १० नव्या बसगाड्या मंजूर केल्या असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५ गाड्यांचे लोकार्पण या वेळी करण्यात आले. उर्वरित गाड्या लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
लोकार्पणप्रसंगी आमदार सुनील शेळके यांनी तळेगाव दाभाडे आगारातील व्यवस्थापक, चालक, वाहक, तिकीट निरीक्षक यांच्याशी चर्चा करून आगाराच्या अडचणी, सेवांमधील अडथळे, तसेच प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा यांचा सविस्तर आढावा घेतला. बससेवा अधिक चांगल्या प्रकारे चालाव्यात यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही चर्चा झाली.
या नव्या बसगाड्यांमुळे तळेगाव, लोणावळा, पुणे, आंबेगाव, मुळशी परिसरातील प्रवाशांना अधिक नियमित व वेळेवर सेवा मिळणार असून, मावळातील ग्रामीण व शहरी भागांमधील दळणवळण सुलभ होणार आहे.