भोसरी : महापालिकेच्या वतीने शहरभर विविध विकासकामे जोरात सुरू आहेत. स्थापत्य विभाग, विद्युत विभाग, पाणीपुरवठा विभाग, जलनिस्सारण विभाग आदी विभागाच्या वतीने ठिकठिकाणी कामे सुरू आहेत. परंतु, ही कामे सुरू असलेल्या ठिकाणी कामगारांना विशिष्ट प्रकारच्या सुरक्षाविषयक उपकरणांशिवाय काम करताना सर्रास पाहावयास मिळत आहे. धोकादायक स्थितीत काम करणार्या कामगारांच्या सुरक्षेला काडीचे महत्त्व नाही. पालिकेच्या संबंधित विभागाकडून कामगारांच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्य नसल्याचे दिसते.
काम करणार्या कामगारांना सुरक्षेसाठी हातमोजे, अॅप्रन, सेप्टी शूज, गॉगल, फेस मास्क, हेल्मेट, गमबूट यासारखे वैयक्तिक सुरक्षेसाठी आवश्यक असलेली उपकरणे पुरविणे बंधनकारक आहे. परंतु, सुरक्षा साधनांचा वापर न करता जीवावर उदार होऊन कामगार काम करतानाची वास्तव परिस्थिती आहे. परंतु, याकडे ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. लाखोंची बिले उकळणारे कंत्राटदार व सुस्त महापालिका प्रशासनाला यातून कामगारांच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्य नसल्याचे दिसते. त्यामुळे एकादी दुर्दैवी घटना घडल्यास त्याची जबाबदारी घेणार कोण? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.
शहरभर हजारो कामगार उपजीविकेसाठी काम करीत आहेत. अनेक कुशल व अकुशल कामगार अतिशय कमी मोबदल्यात काम करीत आहेत. मालकांच्या लेखी कामगारांच्या सुरक्षेला काडीचे महत्त्व नाही नसल्याचे कामगार सांगतात. स्ट्रीट लाइट पोल उभारणी किंवा रंगोटी, दुभाजकाचे दुरुस्ती व रंगकाम, झाडांची छाटणी, रस्त्याच्या मधोमध असलेले चेंबर, उंचावरील कामे पालिकेच्या संबंधित विभागाकडून करून ठेकेदारी पद्धतीने घेतली जातात.
मात्र, कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेणे, कामगारांना सुरक्षा साहित्ये पुरविणे ही संबंधित विभागाच्या सुरक्षा अधिकार्यांची व काम घेणार्या कंत्राटदाराची जबाबदारी असताना त्यांनी मात्र सोयीस्कररित्या सुरक्षा नियमाकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. परिणामी महापालिका प्रशासनाने बनविलेले कामगार कायदे व सुरक्षा नियमावली धाब्यावर बसविली असल्याचे
चित्र आहे.
सुरक्षा साधने पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी ठेकेदाराची असते. सुरक्षा नियम पाळण्याबाबत निविदेत अटी व शर्ती नमूद असतात. कनिष्ठ व उप अभियंता साईट पाहणी करून सदर ठेकेदारास सुरक्षाविषयक योग्य काळजी घेण्यास सूचना देतात. काही वेळा मेमोदेखील काढण्यात येतात.
– संजय घुबे, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग
अनेक ठिकाणी कामगार सुरक्षा साहित्यविना काम करीत असतात. पालिका प्रशासनाने कामगारांचा सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. नुसताच कागदावर सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात काही अर्थ नाही.
– सुनील लांडगे, नागरिक