पुणे

उन्हाळ्यात घ्या पाळीव प्राण्यांची काळजी ; रखरखत्या उन्हामुळे प्राणी आजारी पडण्याचे प्रमाण जास्त

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्या वातावरणात होणार्‍या तापमान वाढीचा त्रास मानवासह प्राण्यांनाही होत आहे. सध्या तरी तापमान 35 ते 36 अंशादरम्यान असले तरी दुपारी भयानक ऊन आणि उकाडा जाणवत आहे. केवळ स्वतःची काळजी घेणेच नाही तर वाढत्या उष्णतेमध्ये आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेणेदेखील महत्त्वाचे आहे. रखरखत्या उन्हामुळे प्राणी आजारी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, उन्हामुळे सर्वात जास्त डिहायड्रेशन, गॅस्ट्रो, भूक मंदावणे यासारखे त्रास होत आहेत.

अलीकडच्या काळात घरात एखादा प्राणी पाळण्याचे प्रक्रार हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, वातावरणात बदल झाले की प्राण्यांना वेगवेगळ्या प्रकरचे आजार होत असतात. उन्हाळ्यात जिथे पाळीव प्राण्यांना बाहेर जाऊन मौजमजा करायची असते, तिथे वाढत्या तापमानात त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक असते.

उष्णतेची लाट किंवा उष्माघाताच्या संपर्कात असताना प्राणी अधिक श्वास घेतात, त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि लाळ जास्त येते. अशा परिस्थितीत, त्यांना बाहेर ठेवू नका आणि त्यांना घराच्या आत थंड आणि कोरड्या जागी आराम करू द्यावा. त्यांना ताजे पाणी द्यावे.
बंद गाडीत प्राणि ठेवणे टाळा. यामुळे उष्माघात आणि गुदमरल्यासारखे होऊ शकते. पिसू आणि उवा यासारख्या कीटकांपासून त्यांचे संरक्षण करा. उन्हाळ्यात ते प्राण्यांवर जास्त चिकटतात. उन्हाळ्यात रस्ता गरम होऊ शकतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथचे तापमानही वाढते. त्यामुळे सकाळी लवकर किंवा रात्री फिरायला न्यावे.

जनावरांना वेळोवेळी आंघोळ घाला. त्यांची नखे कापा. पाळीव प्राण्याचे केस वाढले असेल तर तेदेखील कापून टाका.
उन्हाळ्यामध्ये पाळीव प्राण्यांना शक्यतो मांसाहारी व प्रोटीनयुक्त आहार जास्त प्रमाणात देवू नये त्यामुळे शरीरातील उष्णता वाढते. आहारात दह्याचा समावेश असावा. त्यांना सावलीत व थंड ठिकाणी बसण्याची व्यवस्था करावी.
                      – डॉ. अरुण दगडे,पशू वैद्यकीय अधिकारी पिं.चिं. मनपा)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT