टाकळी हाजी, पुढारी वृत्तसेवा: टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील रस्त्याचे काम चालू असून, प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ पुलाचे काम चालू आहे. या ठिकाणी सुरक्षिततेसाठी कोणत्याही प्रकारचे फलक लावले नाहीत. पुलाचे काम चालू असल्यामुळे वाहतूक बाजूने वळविली आहे. मात्र फलकांअभावी काम धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
शनिवारी (दि. 15) रात्री रस्त्याचा कोणताही अंदाज न आल्याने दोन तरुण मोटारसायकलसह बाजूने वळण मार्गाने जाण्याऐवजी सरळ गेले. अपघात होता होता थोडक्यात बचावले. दोन वेळा अशी घटना घडल्यामुळे तेथील दुकानदारांनी तिथे उपाययोजना म्हणून जवळच पडलेल्या लाकडी फळ्या उभ्या केल्या आहेत.
पुढील होणारे अपघात त्यामुळे टळले आहेत. यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष बाबाजी रासकर, मच्छिंद्र शिंदे, अभी गाडीलकर, दादा रासकर, विजय आटोळे आदींनी पुढाकार घेऊन रस्त्यावरील अपघात होण्यापासून रोखण्यास मदत केली.
रस्त्याचे काम सुरू झाल्यापासूनच अनेक अडचणी ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहेत. मात्र तरीही ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.