पुणे

सासवड : स्वाइन फ्लूच्या रुग्णात पुरंदरमध्ये वाढ

अमृता चौगुले

सासवड; पुढारी वृत्तसेवा: पुरंदर तालुक्यामध्ये स्वाइन फ्लूचे 9 रुग्ण आढळून आले आहेत. स्वाइन फ्लू रुग्ण आढळलेल्या कार्यक्षेत्रामध्ये दैनंदिन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सर्वेक्षणामध्ये आढळून आलेल्या संशयित रुग्णांचे स्वॅब पुणे येथे पाठवण्यात आले आहेत व त्यांच्यावर प्रतीबंधात्मक उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे यांनी दिली.  ग्रामीण रुग्णालयात शहरातील सहा आणि ग्रामीण भागातील तीन रुग्ण आढळून आले.

यामध्ये शहरात दोन व ग्रामीण भागात दोन रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील चार जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सासवड आणि परिसरात डेंग्यू, चिकुनगुनिया, स्वाइन फ्लू, मलेरिया व इतर ताप या साथीच्या आजारांवर सासवड नगरपालिकेच्या वतीने उपाय योजना करण्यात येत आहे. नगरपालिका प्रशासन व ग्रामीण रुग्णालय यांनी संयुक्तरीत्या जंतनाशक फवारणी, तसेच आरोग्य कर्मचारी अधिकारी यांनी घरोघरी भेट देऊन तपासणीचे काम सुरू आहे.

सासवड शहरात नगरपरिषदेच्या वतीने घरोघरी जाऊन कंटेनर सर्व्हे करण्यात येत आहे. त्यामध्ये साठलेल्या पाण्याच्या टाक्या, बॅलर, डबकी यामध्ये टेमीफॉस औषध टाकण्यात येत आहे, तसेच नगरपालिका आवार व पाणीपुरवठा केंद्र येथील गप्पी मासे पैदास केंद्र येथून गप्पी मासे नागरिकांनी घेऊन जावे.
                                                                    – मोहन चव्हाण,
                                                       आरोग्य प्रमुख, सासवड नगरपरिषद

स्वाइन फ्लूची लक्षणे आढळलेल्या लोकांनी घाबरून न जाता लवकरात लवकर नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून योग्य ते उपचार घ्यावेत. सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचार्‍यांना योग्य ती माहिती देऊन स्वाइन फ्लू साथीचा रोगप्रसार थांबवण्यासाठी सहकार्य करावे.
                                                                   – डॉ. विक्रम काळे,
                                                               आरोग्य अधिकारी, पुरंदर

SCROLL FOR NEXT