पुणे

चोरीसाठी दोघींचा ‘सोलापूर व्हाया पुणे पॅटर्न’

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सोलापूरहून त्या दोघी चोरी करण्यासाठी पुण्यात दाखल होत असत. चोरी केल्यानंतर त्या परत थेट सोलापूर गाठत. त्यानंतर चोरीच्या दागिन्यांची गुलबर्गा येथील सराफाकडे विल्हेवाट लावत होत्या. एकेदिवशी त्या स्वारगेट पोलिस ठाण्याच्या परिसरात संशयास्पद फिरताना दिसून आल्या. पोलिस कर्मचारी संदीप घुले आणि अनिस शेख यांच्या नजरेने त्यांना अचूक हेरले. त्यांचा चोरीचा सोलापूर व्हाया पुणे पॅटर्न समोर आला. स्वारगेट बस स्थानक, पीएमपीएमएल बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलांचा किमती ऐवज चोरी करणार्‍या दोन महिलांना स्वारगेट पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून आठ गुन्ह्यांचा छडा लावत 9 तोळे वजनाचे सहा लाख 60 हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले. करुणानिधी सिद्धराज जिनकेरी (वय 25), श्वेता ऊर्फ सरिता काशीनाथ पाटील (वय 24, रा. दोघी सोलापूर; मूळ तारफेल, गुलबर्गा) अशी दोघींची नावे आहेत.

स्वारगेट ते नागपूर या बसमध्ये चढत असताना एका प्रवाशाची सोन्याची साखळी चोरी गेली होती. त्या गुन्ह्याचा तपास स्वारगेट पोलिस करीत होते. त्यादरम्यान महिला पोलिस कर्मचार्‍याच्या मदतीने दोघींना पकडले. त्यांच्याकडे चोरीचा मुद्देमाल त्यांनी गुलबर्गा येथील एका सराफाला विक्री केल्याचे कबूल केले. ही कामगिरी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे, सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, कर्मचारी शिवा गायकवाड, फिरोज शेख, सुजय पवार, मुकुंद तारू, दीपक खेंदाड यांच्या पथकाने केली.

असा मारायच्या डल्ला
पुण्यातील बसमध्ये चोरी केल्यानंतर दोघी आरोपी महिला थेट सोलापूर गाठत होत्या. बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चालू बसमध्येच त्या चोरी करून उतरत असत. प्रवासी बसमध्ये चढताना दरवाजाजवळ सावज जाळ्यात आले की कटरच्या साह्याने हातातील बांगडी, गळ्यातील सोनसाखळी चोरी करीत होत्या.

SCROLL FOR NEXT