पुणे : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विशेष विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा 2022-23 या वर्षात 3 हजार 277 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. एकूण अर्ज 3 हजार 600 इतके प्राप्त झाले असल्याने उर्वरित लाभार्थ्यांना निधी प्राप्त होताच तत्काळ लाभ देण्यात येईल, असे समाजकल्याण, पुणेच्या सहायक आयुक्त संगीता डावखर यांनी कळविले आहे.
सामाजिक न्याय विशेष विभागाच्या 13 जून 2018 च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. शासनाने दहावी नंतरच्या 11 वी 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या, मात्र शासकीय वसतिगृहात राहत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात येते.
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात अधिक प्रमाणात अर्ज प्राप्त होतात. या योजनेत 2022-23 मध्ये 3 हजार 600 अर्ज प्राप्त झालेले असून, प्राप्त 10 कोटी 9 लाख 38 हजार रुपये तरतुदीतून 3 हजार 277 विद्यार्थ्यांना लाभ दिला आहे. पात्र विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी 10 कोटी रुपयांची मागणी विभागाकडे करण्यात आली आहे. स्वाधार योजनेबाबत विद्यार्थ्यांना काही समस्या असल्यास त्यांनी सहायक आयुक्त, समाजकल्याण, पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही डावखर यांनी केले आहे.
स्वाधार योजनेचा लाभ
वर्ष विद्यार्थी लाभ (रुपये)
2017-18 656 16 लाख 39 हजार
2018-19 1 हजार 457 7 कोटी 30 लाख 82 हजार
2019-20 1 हजार 597 7 कोटी 37 लाख 16 हजार
2020-21 936 89 लाख 17 हजार
2021-22 1 हजार 163 3 कोटी 4 लाख 59 हजार