नारायणगाव: जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून विजेचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे शेतकर्यांना शेतीला पाणी देणे अवघड होऊन बसले आहे. विजेच्या या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
जुन्नर तालुक्यात दिवसाही वीजपुरवठा होत नाही. महावितरणने जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सुद्धा वीजपुरवठा होत नाही. आर्वी, गुंजाळवाडी, पिंपळगाव सावरगाव, बस्ती या परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात विजेचा लपंडाव सुरू आहे. कांदा, गहू व इतर तरकारी पिकांना पाण्याची गरज जास्त असते.
कोथिंबीर, मेथी या पिकाला तर दिवसाला पाणी द्यावे लागते. परंतु, वीजपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्यांचा उपद्रव आहे. काही गावे तर बिबट्यांसाठी हॉटस्पॉट बनली आहेत. त्यामुळे रात्री पिकाला पाणी देणे शेतकर्यांना शक्य होत नाही.
त्यात सध्या उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून कोवळ्या पिकाला उन्हाचा तडाखा बसत आहे. विजेचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने पिकाला पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा शेतकरी संघटनेला आंदोलन करावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला आहे.
सध्या शेतीपिकाला बाजारभाव नाही. त्यात विजेचा लपंडाव सुरू असल्याने पिकाला पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. बोअरवेलचे पाणीही कमी होऊ लागले आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा शेतकर्यांसाठी अधिक अडचणीचा ठरणार आहे.- प्रभाकर बांगर, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.