पुणे

पुणे: नागरिकांची पाण्यासाठी वणवण, सुतारदरा परिसरातील चित्र; पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

अमृता चौगुले

पौडरोड, पुढारी वृत्तसेवा: कोथरूड परिसरातील सुतारदरा भागातील राजमाता जिजाऊनगरमध्ये नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, यामुळे पाण्यासाठी त्यांना वणवण करावी लागत आहे. या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पौड रोडवरील सुतारदरा परिसरातील काही नागरिकांनी अनधिकृतपणे नळजोड घेतले आहेत. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी या भागातील काही नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या भागातील अनेक पुरुष व महिला कामाला जात असतात. त्यातच दुपारच्या वेळेस पाणी येत असल्याने घरातील मुलांना किंवा कामावर जात असलेल्या पुरुष व महिलांना सुटी घेऊन पाणी भरण्यासाठी थांबावे लागत आहे. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याने परिसरातील पाण्याची समस्या गंभीर झाली आहे, यामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे.

पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता विजय देवकाते म्हणाले, 'या भागाला वारजेहून पाणी येत आहे. त्यातच पाण्याची टाकीची उंचीवर आहे. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे. मात्र, नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.'

आम्हाला गरजेपुरते पाणी मिळावे, यासाठी अनेक वेळा महापालिकेकडे मागणी केली आहे. मात्र, आतापर्यंत आम्हाला आश्वासने सोडून काहीच मिळाले नाही. या भागाला पुरेसे पाणी मिळणार तरी कधी ?

– जयश्री शेलार, रहिवासी

या भागाला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी आणखी दहा लाख लिटरच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. यामुळे लवकरात लवकर या भागातील नागरिकांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे.

-अ‍ॅड. रामचंद्र कदम, माजी नगरसेवक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT