विभागीय कार्यालयासमोरील आंदोलनात सुषमा अंधारे यांच्या सोबत सहभागी झालेले शिवसैनिक पुढारी
पुणे

Pune Drugs Case | अनधिकृत पबला कुणाचा आशीर्वाद: सुषमा अंधारे

विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करत मंत्री व अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुणे शहराची ड्रगच्या विळख्यातून सुटका व्हावी यासाठी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी पाठवलेल्या नोटीसला आम्ही घाबरत नाही. पुण्यात केवळ अधिकृत 23 पब, बार आहेत, त्यांच्याकडे परवाना आहे. मग 100 पब, बार कोणाच्या आशीर्वादने चालतात, असा सवाल शिवसेनेच्या (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

मंत्र्यांनी व अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा

पुण्याची ड्रगच्या विळख्यातून सुटका व्हावी, तसेच मंत्री आणि अधिकार्‍यांनी राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी शिवसेनेकडून (ठाकरे) विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या. शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे आदी उपस्थित होते.

पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचा बट्टयाबोळ

अंधारे म्हणाल्या, पुणे विद्येचे माहेरघर म्हटले जाते, पण आता याच पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मंत्री देसाई कोणत्या तोंडाने तुम्ही नोटीस पाठवत आहात. नोटीस पाठवता मग कारवाई का होत नाही? राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकार्‍यांचे आणि मंत्र्यांचे लागेबांधे असल्याचा आरोपदेखील या वेळी अंधारे यांनी केला.

त्या म्हणाल्या, पुण्यातील पब, बारची माहिती आमच्याकडे आहे, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत कारवाई का करत नाहीत? राजपूत यांचे निलंबन करून कारवाई केली पाहिजे, त्यांची चौकशी केली पाहिजे. 23 अधिकृत पब बारव्यतिरिक्त इतर पब बारवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अंधारे यांनी केली.

सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम

माझ्या बीड दौर्‍यानंतर परळीतील शिवाजी चौकात काही लोकांनी माझा पुतळा जाळल्याचा प्रकार घडला असल्याची माहिती मला मिळाली. त्यानुसार याबाबत शहानिशा करण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी मी फोनवर चर्चा केली त्या वेळी कोणत्याही अनुचित प्रकाराला त्या थारा देणार नाहीत असे सांगत, संबंधित घटनेतील व्हिडीओ मागवून ते कार्यकर्ते आपले नसल्याचे सांगितले.

रिकामटेकडे समाजकंटक असे उद्योग करून समाजमन कलुषित करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांकडे दुर्लक्ष करून हिताचे प्रश्न हाताळणे गरजेचे असल्याचे अंधारे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT