पुणे

नद्या स्वच्छ करण्यासाठी जलतज्ज्ञांना आता बळ, राज्य शासनाचा देखील पुढाकार; ‘चला जाणूया नदीला’अंतर्गत झाली बैठक

अमृता चौगुले

भिगवण, पुढारी वृत्तसेवा: भीमा, उजनीसह पुण्यातील दूषित झालेल्या नद्यांना जाणून घेण्यासाठी शासन आणि जलतज्ज्ञ यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सकारात्मक चर्चा नुकतीच झाली. शासनाच्या प्रत्यक्ष सहभागामुळे आता नद्या स्वच्छ करण्यासाठी जलतज्ज्ञांनाही बळ मिळाले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवअंर्तगत 'चला जाणूया नदीला' अभियानाच्या साहाय्यासाठी गठित केलेल्या जिल्हास्तरीय समितीची पहिली आढावा बैठक शुक्रवारी (दि. 18) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील सर्व नद्या विशेषतः भीमा व उजनी प्रदूषित होण्यास पिंपरी-चिंचवड, पुणे व कुरकुंभ औद्योगिक कंपन्यांवर उपस्थितांनी खापर फोडले. या दूषित झालेल्या नद्यांना स्वच्छ करण्यासाठी शासन, जलतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते जसे एकवटले आहेत तसेच या अभियानात कंपन्या व विद्यार्थ्यांना सामावून घेणे गरजेचे असल्याचे मत पुढे आले.

जिल्ह्यातील सर्व नद्यांची अवस्था अतिशय बिकट झाल्याने यापुढे प्रदूषण करणार्‍यांवर कडक दंडात्मक कारवाईचा बडगा उगरण्याची गरज निर्माण झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. अलीकडे शेतीसाठी रासायनिक व सांडपाणी वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. यातून पिके तरतरीत येतात. मात्र, त्याचा आरोग्यावर किती भयंकर परिणाम होतो, याचा विचार होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

धक्कादायक बाब म्हणजे पुण्याच्या वरील भागातील नद्यांमध्ये जिथे कमी शहरीकरण व औद्योगिक वसाहत नाही अशा भागांतही प्रदूषणपातळी वाढत असून, आरोग्याला धोकादायक असलेले घटक आढळून येत असल्याचे सांगण्यात आले.
या दूषित झालेल्या नद्यांना वाचविता येईल. यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. शासनाने आता यात सहभाग घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात याविषयी कृती आराखडा बनविला जाईल, असे मत पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता तथा जिल्हास्तरीय समितीचे सचिव संजीव चोपडे व विजयसिंह देशमुख यांनी व्यक्त केले.

या बैठकीस नरेंद्र चुघ, विनोद बोधनकर, शैलजा देशपांडे, सारंग यादवाडकर, भरत मल्लाव, प्रदीप वाल्हेकर, पुष्कर कुलकर्णी, राधिका कुलकर्णी आदींसह पवना, मुठा, मुळा, घोड, मीना, वेळगंगा, राम, भीमा नदीवर कार्य करणारे जलतज्ज्ञ, स्वयंसेवक, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिका अधिकार्‍यांची दांडी

दरम्यान, शासनाच्या वतीने ही जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. याबाबत अधिकृत पत्रव्यवहार सर्व शासकीय विभाग तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला करण्यात आला होता. वास्तविक, सर्वाधिक प्रदूषण पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातून होत असल्याने बैठकीस महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणे गरजेचे होते. मात्र, यापैकी कोणीही हजर न राहिल्याने उपस्थित जलतज्ज्ञांनी तीव्र संताप व्यक्त केला.

बूमरँग सुरू

भीमा नदी व उजनी धरण हे पुणे, पिंपरीकरांकडून सर्वाधिक प्रदूषित झाले आहे. त्यामुळे उजनीकर भयंकर रोगराईला सामोरे जात आहेत. हे वास्तव असले, तरी उजनीतील मासे व पिकवलेल्या पालेभाज्या या पुण्यातच विक्रीला येत असल्याने आपण जसे देतो तसे परत घेत आहोत, हे लक्ष्यात घ्यावे, असा चिमटा या वेळी काढण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT