पुणे: ससून सर्वोपचार रुग्णालय गरीब आणि गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. तृतीयक सेवा देणार्या ससूनमध्ये आता सुपर स्पेशालिटी सुविधा सुरू होण्याबाबत आशेचा किरण निर्माण झाला आहे. याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
ससून रुग्णालयात सध्या सुपर स्पेशालिटी विभाग नसला तरी तज्ज्ञ डॉक्टर आहेत. परंतु, स्वतंत्र वैद्यकीय शिक्षण देऊन विद्यार्थी घडवणारा विभाग नाही. सध्या मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेज, जेजे हॉस्पिटल आणि छ. संभाजी नगरमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय या रुग्णालयांमध्ये सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध आहेत.
याच धर्तीवर ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा सुरू झाल्यास पुणे जिल्ह्यासह आसपासच्या परिसरातील गरजू रुग्णांना लाभ मिळू शकणार आहे. सुपर स्पेशालिटी सुविधांमध्ये न्यूरो सर्जरी, बालरोग शस्त्रक्रिया, युरोलॉजी आणि युरो सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, कार्डिओलॉजी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि नेफ्रोलॉजी या सुविधांचा समावेश केला जाईल.
याबाबत ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार म्हणाले, की सध्या ससूनमध्ये सर्व वैद्यकीय आजार असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. परंतु, हे विभाग आल्यावर आणखी शिक्षक सदस्य जोडले जातील आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडून अधिक खाटा मंजूर केल्या जातील. यामुळे रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष (वॉर्ड) देखील उपलब्ध होतील.
तसेच, त्यासाठी स्वतंत्र इमारत देखील बांधण्यात येईल. सध्या अतिदक्षता कक्षाच्या खाटा नेहमी भरलेल्या असतात. सध्या आमच्याकडे वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी सुपर स्पेशालिटीअंतर्गत फक्त नऊ जागा आहेत, ज्यामुळे रुग्णांची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यामध्ये 60 पर्यंत वाढ होईल.
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार म्हणाले, सध्या ससूनमध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र, त्यासाठी स्वतंत्र विभाग नाही. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास अधिक शिक्षक जोडले जातील आणि सरकारकडून अधिक खाटा मंजूर केल्या जातील. यामुळे रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू होईल आणि आम्ही वैद्यकीय शिक्षणासाठी अधिक सक्षम होऊ शकू. सुपर स्पेशालिटी विभागांसाठी एक स्वतंत्र इमारत असेल.
काय होणार फायदा?
रुग्णांच्या मागणीच्या तुलनेत सध्या ससूनची क्षमता मर्यादित आहे. ससूनमधील खाटा, विशेषत: आयसीयू बेड नेहमी भरलेले असतात. सुपर स्पेशालिटी सुविधा सुरू झाल्यावर डॉक्टरांची संख्या वाढवता येईल. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या जागा आणि प्राध्यापकांची संख्याही वाढेल. सध्या बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये सुपर स्पेशालिटीअंतर्गत फक्त नऊ जागा आहेत. प्रस्ताव मंजूर झाल्यास जागांमध्ये 60 पर्यंत वाढ होईल.
रुग्णालयाला सुपर स्पेशालिटीमध्ये श्रेणीसुधारित करणे म्हणजे कार्डिओलॉजी आणि युरोलॉजीशी संबंधित रुग्णांच्या सेवेत सुधारणा होईल. आमच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाचे सुपर स्पेशालिटी प्रशिक्षणही मिळू शकेल. आम्ही सेवा मिळवण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. शिक्षण आणि आरोग्य हे राज्याचे विषय आहेत. केंद्र सरकारच्या काही योजना आहेत, ज्याअंतर्गत आम्हाला काही निधी मिळण्याची आशा आहे. ज्यामुळे आम्हाला हॉस्पिटल अपग्रेड करण्यास मदत होईल, म्हणूनच आम्ही त्याच्या मंजुरीची वाट पाहत आहोत.- डॉ. राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण विभाग