सुपे: बारामती तालुक्यातील सुपे येथील एका तरुणाचे अपहरण करून वाहन सासवडच्या दिशेने गेले. याची माहिती मिळताच सुपे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने तीन तास पाठलाग करून ते वाहन झेंडेवाडी (ता. पुरंदर) परिसरात अडविले. त्यातील दोघांना ताब्यात घेऊन अपहृत तरुणाची सुटका करण्यात आली. ही थरारक घटना शनिवारी (दि. ६) रात्री आकराच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी अपहृत ऋषिकेश विजय चांदगुडे (रा. सुपे, ता. बारामती) यांने फिर्याद दाखल केली. त्यानुसार सुपे पोलिसांनी ओंकार प्रकाश भोसले (वय २७), तन्मय सुधीर साळुंखे (वय २०, रा. सातव चौक, बारामती) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
ऋषिकेशचे अपहरण करून लाल रंगाच्या कार (एमएच ४२ बीजे ४४४५) मधून आरोपी ओंकार भोसले व तन्मय साळुंखे सासवडच्या दिशेने गेले. याची माहिती मिळताच सुपे पोलिसांनी जेजुरी, सासवड, उरुळी कांचन व यवत पोलिसांना नाकाबंदीबाबत सूचना दिल्या. तसेच, कुलदीप चांदगुडे यांना प्राप्त झालेल्या मोबाईल कॉलची माहिती मिळाल्यानंतर संबंधित मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण पोलिसांनी केले.
त्यानुसार लोकेशन निष्पन्न झाल्याने सुपे पोलिस पथकाने तत्काळ दिवे घाट परिसरात जाऊन संशयित वाहनाचा पाठलाग केला. यादरम्यान सासवडचे पोलिस निरीक्षक कदम यांच्याशी संपर्क साधून मदत घेण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार सासवडचे पोलिस उपनिरीक्षक जाधव व त्यांचे पथक मदतीस दाखल झाले. सुपे आणि सासवड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत झेंडेवाडी येथे संशयित वाहन अडविण्यात आले.
या वेळी कारमधील ओंकार भोसले व तन्मय साळुंखे आणि दिव्या ओंकार भोसले (वय २२, रा. सातव चौक, बारामती) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे अपहरण झालेला ऋषिकेश चांदगुडे यास सुरक्षितरीत्या शोधून काढण्यात आले. या वेळी ताब्यात घेलेल्या दोघांवर यापूर्वी जिवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल आहे. आताही त्याच कलमाखाली अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी दिली.