खोर : पुढारी वृत्तसेवा : मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवजड वाहनांच्या वर्दळीबरोबरच तीव— चढण व वळणांमुळे सुपे-चौफुला (ता. दौंड) हद्दीत असलेला सुपे घाट वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. आठवड्यातून किमान दोन ते तीन अपघात या घाटात होत आहेत. शुक्रवारी (दि. 10)देखील घाटात मालवाहू ट्रक व नवीन ट्रकच्या चॅसीची समोरासमोर धडक झाली. या अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा उडाला.
सुपे-चौफुला हा राज्य महामार्ग असून, मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वर्दळ असते. ही वाहने सुपे घाटात येताच तीव— चढण आणि वळणांमुळे त्यांचा वेग मंदावतो. त्यामुळे घाटाच्या सुरुवातीपासून वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. त्यातच क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणारी काही वाहने घाटात मध्येच बंद पडतात. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडतो. सध्या हा घाट अपघातांना निमंत्रण देत असून, वाहनचालकांसह प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
घाटात मालवाहू ट्रक व शोरूमला जाणार्या नवीन ट्रकच्या चॅसीची शुक्रवारी (दि. 10) जोरदार धडक झाली. सुदैवाने या अपघातात कोणती जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहतुकीची कोंडी झाली. घाटाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या.
वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी सुपे घाटातील अपघात क्षेत्र व तीव— वळणे कमी करण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह, वाहनचालक व प्रवासीवर्ग करीत आहे.