सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील उपबाजार समितीच्या आवारामध्ये बाजरीच्या सुमारे साडेचार ते पाच हजार पोत्यांची उच्चांकी आवक झाली. बुधवारी (दि. 15) येथील उपबाजारात बाजरीला प्रति क्विंटल किमान 2 हजार 200 ते कमाल 3 हजार 300 तर सरासरी 2 हजार 751 रुपये दर मिळाला. या वेळी बाजारात प्रथमच एवढया मोठ्या प्रमाणात बाजरीची आवक झाल्याने दोन दिवस लिलाव सुरू होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. 16) संध्याकाळी उशीरापर्यंत लिलाव सुरू होते. (Latest Pune News)
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुपे येथील उपबाजारामध्ये बारामती तालुक्यासह, दौंड, शिरूर आणि पुरंदर आदी ठिकाणावरून शेतकरी बाजरी विक्रीसाठी आणतात. यावर्षी समाधानकारक पाऊस आणि पोषक हवामानामुळे बाजरीचे उत्पादन वाढले आहे. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना चांगले दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे आणि उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी दिली. शेतकऱ्यांनी शेतमाल स्वच्छ आणि वाळवून आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे शेतमालाला आणखी चांगला दर मिळू शकतो, अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
येथे मागील आठवड्यापासून बाजरीची आवक वाढली आहे. सद्या दिवाळीचा सण असल्याने शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणत आहेत. त्याला चांगला बाजारभाव मिळत आहे.सुभाष चांदगुडे, आडत व्यापारी
ज्वारी- 2700 ते 3400, गहू- 2500 ते 3000, मका- 1800 ते 2950, हरभरा- 4751 ते 5630, उडीद- 4500 ते 5390, सोयाबीन- 3800 ते 4151 आणि सूर्यफूल- 4900 ते 5300.