पारगाव; पुढारी वृत्तसेवा : आंबेगावच्या पूर्व भागात शुक्रवारी (दि.7) पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका उन्हाळी बाजरीच्या पिकाला बसला आहे. अनेक शेतांमधील फुलोर्यात आलेले बाजरीचे पीक भुईसपाट झाले आहे. काही ठिकाणी बाजरीची कणसे काळी पडण्याची शक्यता आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. दरवर्षी उत्पादनही अधिक मिळते. यंदा सुरुवातीपासूनच बाजरी पिकाला मुबलक पाणी, स्वच्छ हवामानाची साथ मिळाली. त्यामुळे सर्वत्र बाजरीचे पीक जोमदार आले आहे. परंतु सलग दोन वेळा अवकाळी पावसाचा फटका बाजरी पिकाला बसला. एक महिन्यापूर्वीही अवकाळी पाऊस या परिसरात पडला होता.
शुक्रवारी दुपारी वादळी वार्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. यामुळे अनेक ठिकाणी फुलोर्यात आलेले बाजरीचे पीक भुईसपाट झाले. काही ठिकाणी बाजरीच्या कणसांमध्ये दाणे भरलेले आहेत. ही कणसे भुईसपाट झाल्याने ती काळी पडून उत्पादनात घट होईल, असे शेतकरी विजय चासकर यांनी सांगितले.