पुणे: पावसाच्या सरींनी जशी धरती चिंब भिजते, तशीच दिवंगत ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या अजरामर गीतांच्या स्वरधारांनी पुणेकर रसिकांची मने भिजली. सभागृह खचाखच भरलेले असताना स्वर, शब्द आणि भावनांच्या या सुरेल वर्षावात रसिक अक्षरशः चिंब झाले. दै. 'पुढारी' माध्यम समूहाच्या वतीने आयोजित आणि पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. पुणे प्रस्तुत 'सुमनांजली' या सांगीतिक कार्यक्रमात गायिका अपर्णा संत यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनातून सुमनताईंच्या गायकीचे विविध पैलू उलगडले. तर, कलाकारांच्या सुरेल सादरीकरणाने आणि प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या बासरीवादनाने रसिकांची मने जिंकली. कलाकारांनी आपल्या स्वरांमधून सुमनताईंना भावपूर्ण स्वरांजली अर्पण केली.
आपल्या गायकीने रसिकांच्या मनावर वेगळी छाप उमटवणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या समृद्ध सांगीतिक वारशाला आणि संगीतविश्वातील अमूल्य योगदानाला कृतज्ञ अभिवादन करण्याच्या भावनेतून आयोजित या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमन कल्याणपूर यांचे भाचे महेश कलावर यांचा विशेष सन्मानही करण्यात आला. या विशेष स्वरमैफलीत सुमनताईंच्या कारकिर्दीतील निवडक प्रेमगीते, भावगीते, भक्तिगीते आणि चित्रपट संगीतातील अजरामर रचनांचा सुरेल नजराणा रसिकांसमोर सादर करण्यात आला. प्रत्येक गीतानंतर टाळ्यांचा कडकडाट होत होता.
मधुरा दातार, श्रुती देवस्थळी, चिन्मयी तांबे आणि केतन गोडबोले यांनी सुमनताईंची अजरामर गीते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादर करून रसिकांची मने जिंकली. अपर्णा संत यांनी सुमनताईंच्या सांगीतिक प्रवासातील अनेक आठवणी, त्या काळातील संगीतकार - गीतकारांचे योगदान आणि प्रत्येक गीतामागील भावविश्व अभ्यासपूर्ण पद्धतीने उलगडले. कार्यक्रमातील आणखी एक आकर्षण म्हणजे अमर ओक यांचे सुरेल बासरीवादन. त्यांनी निवडक गीते स्वतंत्रपणे बासरीवर सादर केली. तसेच, इतर गीतांनाही सुरेल साथ देत मैफलीची उंची वाढवली. त्यांच्या बासरीवादनाने रसिकांची मने जिंकली.
'नाविका रे वारा वाहे रे',‘निंबोणीच्या झाडाखाली चंद्र झोपला गं बाई...’ यांसारख्या सुमधुर मराठी गीतांसह सुमन कल्याणपूर यांनी अजरामर केलेली हिंदी गीते सादर करीत कलाकारांनी पुणेकरांना सुमारे तीन तास मंत्रमुग्ध केले. ‘बाहेर पडताना हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकावा असा वाटेल’, असेच उद्गार रसिक प्रेक्षकांनी काढले.
सुमनांजली कार्यक्रमाची शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता चिन्मयी तांबे यांनी सादर केलेल्या 'ओंकार प्रधान रूप गणेशाचे...' या गीताने झाली. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाने सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. यानंतर अपर्णा संत यांनी सुमनताईंच्या गायकीतील सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गीतातील पात्राशी त्या पूर्णपणे समरस होत असत. त्यामुळे त्यांच्या स्वरांतून केवळ गाणे नव्हे, तर त्या गीतातील भावना जिवंत होत असत, असे सांगत रसिकांना त्यांच्या गायकीचा वेध घडवला.
'नाविका रे वारा वाहे रे' हे गीत मधुरा दातार यांनी सादर केले. त्यांच्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. या गीताच्या निमित्ताने संत यांनी सुमनताईंच्या स्वरांतील शांतता, संयम आणि सात्त्विकतेचा सुंदर आविष्कार स्पष्ट केला. श्रुती देवस्थळी यांनी 'रे क्षणाच्या संगतीने मी अशी भारावले' हे गीत सादर करीत रसिकांची दाद मिळवली. या गीतामागील पार्श्वभूमी आणि त्यातील गायकीची वैशिष्ट्येही संत यांनी उलगडून सांगितली. दरम्यान, सभागृहाबाहेर पाऊसधारा बरसत असतानाच मधुरा यांनी सादर केलेले 'झिमझिम झरती श्रावणधारा' हे गीत वातावरणाशी एकरूप झाले. या गीतातील स्वररचना आणि निसर्गाशी असलेले त्याचे नाते संत यांनी सुंदर शब्दांत स्पष्ट केले.
'पहिलीच भेट झाली...' हे कविवर्य मंगेश पाडगावकर लिखित, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले गीत श्रुती आणि केतन गोडबोले यांनी सादर केले. त्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली. यानिमित्ताने संत यांनी 'आकाश पांघरोनी', 'शब्द शब्द जपून ठेव', 'जिथे सागरा धरणी मिळते' आणि 'निंबोणीच्या झाडामागे...' या गीतांमागील रंजक इतिहास, स्वररचना आणि भावविश्व उलगडले. सुमनताईंच्या अचूक शब्दोच्चारांमुळे त्यांची गीते आजही संगीत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा विषय असल्याचे त्यांनी नमूद केले.
चिन्मयी यांनी 'आकाश पांघरोनी जग शांत झोपले' आणि 'जिथे सागरा धरणी मिळते' ही गीते प्रभावीपणे सादर केली. मधुरा यांनी 'शब्द शब्द जपून ठेव' या गीतातून रसिकांना स्वरानंद दिला, तर श्रुती यांनी 'निंबोणीच्या झाडामागे...' हे गीत सादर करत रसिकांची मने जिंकली. यानंतर 'गरजत बरसत सावन आयो रे' हे गीत मधुरा आणि श्रुती यांनी सादर केले. त्यानंतर मधुरा यांनी 'न तुम हमें जानो' हे हिंदी गीत सादर करून सुमनताईंच्या हिंदी चित्रपटसंगीतातील योगदानाची आठवण करून दिली. 'अजहूँ न आए बालमा सावन बीता जाए' हे मधुरा आणि केतन यांनी सादर केलेले गीत कार्यक्रमाची अविस्मरणीय सांगता ठरले.
केदार परांजपे, मिलिंद गुणे, विशाल गंड्रतवार आणि अजय अत्रे यांनी कलाकारांना समर्पक साथसंगत केली. ध्वनिव्यवस्थेची जबाबदारी मोहीत नामजोशी यांच्या मार्गदर्शनात पार पडली, तर तांत्रिक व्यवस्थापन विक्रम साऊंड, पुणे यांनी सांभाळले. संत यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनाने, कलाकारांच्या दर्जेदार सादरीकरणाने आणि ओक यांच्या जादुई बासरीवादनाने 'सुमनांजली'चा हा स्वरसोहळा रसिकांच्या मनावर कायमचा कोरला गेला. सभागृहातील रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती आणि प्रत्येक गीताला मिळालेली दाद ही सुमन कल्याणपूर यांच्या गायकीवर पुणेकरांचे असलेले प्रेम अधोरेखित करणारी होती. अनेक गीतांना 'वन्स मोअर'ची मागणी झाली. सुमनताईंच्या स्वरांना वाहिलेली ही आदरांजली अनेक रसिकांच्या डोळ्यांच्या कडा नकळत पाणावून
गेली आणि भावनांच्या हिंदोळ्यावर झुलवत दीर्घकाळ स्मरणात राहील, अशीच ठरली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी संपादक सुनील माळी यांनी केले, तर ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. अक्षर, शब्द आणि भाव याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, लतादीदी, आशाताई आणि सुमन कल्याणपूर या मोठ्या का झाल्या, त्यांना महान का म्हणायचे? त्यांनी नुसती गाणी नाही गायली, तर गीतातील अक्षर, शब्द आणि भाव यावर लक्ष देऊन त्यात जीव ओतल्याने ती गाणी अजरामर झाली, असे म्हणत सुमन कल्याणपूर यांनी गाताना घेतलेल्या जागा कशा, कोणत्या भावात घेतल्या त्या प्रत्यक्ष घेऊन दाखवत निवेदन सादर केले.
सुमनताईंचा चित्रमय प्रवास अन् श्रोत्यांचे कॅमेरे
कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण हे भव्य सभागृह गर्दीने खचाखच भरले होते. बाहेर पावसाच्या सरी सुरू असताना सभागृहात श्रोते सुरांच्या सरींत चिंब भिजत होते. व्यापीठावर भव्य डिजिटल पडद्यावर सुमनताईंचा चित्रमय जीवनप्रवास दाखवला जात होता. जे गाणे असेल त्याची थीम घेऊन चित्र दाखवली जात होती. रसिक प्रेक्षक आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपत होते.
'जिथे सागरा धरणी मिळते'ची कहाणी...
अपर्णा संत यांनी सुमनताईंच्या गाजलेल्या अनेक मराठी-हिंदी गीतांची निर्मिती कशी झाली? गीतकार-संगीतकार हे त्या काळात किती मेहनत घेत? याचे किस्से सांगितले, जिथे सागरा... हे उच्चारताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. पी. सावळाराम यांनी हे गीत लिहिले. मात्र, ते लिहिण्यासाठी एक महिला लागला. याला संगीतबद्ध करताना संगीतकार एस. डी. बर्मन यांनी अनेक वाद्यांचा उपयोग केला. त्यामुळेच हे गाणे ऐकले की आजही अंगावर रोमांच उभे राहतात. सुमनताईंनी हे गीत गातांना ज्या जागा घेतल्या त्या किती भावपूर्ण आहेत, हे सांगत त्या जागा सादर करीत टाळ्या मिळवल्या.
लता-सुमन यांचे युगलगीत अन् श्रोते
निवेदिका संत म्हणाल्या, आता पडद्यावर लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर यांचे युगलगीत दाखवले जाईल. यात कोणता आवाज कोणाचा आहे, हे ओळखून दाखवा? त्यानंतर पडड्यावर 'आज कल हमारी सुनतेही नही साजना' हे कृष्णधवल रंगात चित्रित केलेले साठच्या दशकातील गीत दाखवले, ते पाहून श्रोत्यांनी जिवाचे कान केले. मात्र, लतादीदी आणि सुमनताई यांचा आवाज ओळखता आला नाही. शेवटी त्याचा खुलासा अपर्णा संत यांनी केला अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
ओक यांच्या सुरेल बासरीवादनाने जिंकली मने
कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक यांचे अप्रतिम बासरीवादन. 'ओंकार प्रधान रूप गणेशाचे' आणि 'आकाश पांघरोनी' या गीतांतील त्यांच्या सुरेल साथीस रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यानंतर त्यांनी 'मृदुल करांनी छेडित तारा', ' पाखरा जा दूर देशी ', ' लिंबलोण उतरू कशी...', ' केतकीच्या बनी तिथे...' ही गीते बासरीवर सादर करीत दाद मिळवली. नंतर 'केशवा माधवा' आणि 'देव माझा विठू सावळा' या रचना बासरीवर सादर केल्या. त्यांच्या बासरीच्या मधुर स्वरांनी सभागृह अक्षरशः मंत्रमुग्ध झाले आणि टाळ्यांचा कडकडाटही झाला.
सुमनांजली हा केवळ सांगीतिक कार्यक्रम नव्हता, तर सुमन कल्याणपूर यांना वाहिलेली हृदयस्पर्शी स्वरांजली होती. अपर्णा संत यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनासह श्रुती देवस्थळी, चिन्मयी तांबे, मधुरा दातार, केतन गोडबोले आणि अमर ओक यांच्या सुरेल सादरीकरणाने कार्यक्रम अविस्मरणीय ठरला. खचाखच भरलेल्या सभागृहातील रसिकांनी स्वयंशिस्त राखत प्रत्येक गीताला उत्स्फूर्त दाद दिली. अनेक दिवसांनी सुमनताईंच्या अजरामर गीतांचा असा दर्जेदार कार्यक्रम अनुभवायला मिळाला. ही स्वरमैफल दीर्घकाळ मनात गुंजत राहील.महेश आणि शिल्पा कलावर (सुमन कल्याणपूर यांचे भाचे)