पवनानगर : पुढारी वृत्तसेवा : वडगाव मावळ येथील गड भटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या सह खजिनदाराने आईचे आजारपण व गरिबीच्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना शुक्रवारी (दि.18) सकाळी तिकोणा पेठ, (ता. मावळ) येथे घडली. या घटनेची खबर भीमराव मोहळ यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये दिली.
गुरुदास मोहळ (21, रा. तिकोणा पेठ, ता. मावळ) असे आत्महत्या केल्या तरूणाचे नाव आहे. पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुदास मोहळ याने आईचे आजारपण तसेच गरिबीच्या नैराश्यातून वनक्षेत्राच्या हद्दीतील झाडाच्या फांदीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस हवालदार विजय गाले व ग्रामस्थांच्या मदतीने घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
गुरुदास मोहळ हा वयाच्या 12 व्या वर्षांपासून तिकोणा गडावर गडपाल म्हणून होता. तो गडाची स्वच्छता तसेच विविध सण, उत्सव साजरा करत होता. गुरुदास मोहळ याने तिकोणा गडावरील दक्षिण बाजूच्या गुहेचा शोध लावला होता.
गड भटकंती दुर्ग संवर्धन वडगाव मावळ संस्थेचा सह खजिनदार म्हणून काम करत होता. गड, किल्ले व शिव जयंतीच्या माध्यमातून बहुसंख्य शिव भक्तांचा तो आदर्श होता. त्याच्या आत्महत्येमुळे शिवभक्तांमध्ये हळहळ निर्माण झाली आहे. या घटनेचा तपास पोलिस हवालदार विजय गाले करत आहेत.