पारगाव (ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम 15 दिवसांपूर्वी संपला. त्यामुळे कारखानास्थळा वरील ऊसतोडणीसाठी आलेले कामगार आपापल्या गावी निघून गेले. त्याचा परिणाम पारगाव येथे दर शुक्रवारी भरणार्या आठवडे बाजारावर जाणवला. आठवडे बाजारात ग्राहकांची संख्या रोडावली. सोबतच आता कारखाना कार्यस्थळी देखील शुकशुकाट दिसून येत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पारगाव बाजारपेठ मोठी आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामुळे पारगाव येथे रहदारी, दळणवळण वाढले आहे. नुकताच येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गाळप हंगाम संपला. या गाळप हंगामासाठी दरवर्षी बीड, पाथर्डी परिसरातील ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणावर येतात. आता गाळप हंगाम संपल्याने ऊसतोड कामगार आपापल्या गावी गेले आहेत. त्याचा परिणाम पारगाव येथे दर शुक्रवारी भरणार्या आठवडे बाजारावर दिसून आला.
शुक्रवारी (दि. 7) आठवडे बाजारात ग्राहकांची संख्या रोडावल्याचे दिसून आले. याबाबत पारगाव येथील भाजीपाला विक्रेते युन्नूस पटेल म्हणाले, ङ्गभीमाशंकर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर पारगावच्या आठवडे बाजारांमध्ये ऊसतोड कामगार हेच आमचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर असतात. आठवडाभर पुरेल इतका भाजीपाला हे ऊसतोड कामगार दर शुक्रवारी नेतात. शुक्रवारव्यतिरिक्त इतर दिवशी देखील भाजीपाला स्टॉलवर ऊसतोड कामगारांची गर्दी होतच असते. परंतु, आता ते परत गेल्याने व्यवसायावर निश्चित परिणाम झाला आहे.