पुणे

वाल्हे : तोडणीआधीच मजूर करताहेत उसाची होळी; वजनात एकरी 5 ते 6 टन शेतकर्‍यांचे नुकसान

अमृता चौगुले

वाल्हे(ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : मागील 19 महिन्यांपासून पोटच्या पोराप्रमाणे वाढविलेला ऊस तोडून कारखान्याला जाण्यासाठी स्वहस्ते जाळण्याची वेळ वाल्हे परिसरातील शेतकर्‍यांवर आली आहे. या प्रकारामुळे गाळपाला ऊस गेल्यावर शेतकर्‍यांचे प्रतिएकरी 5 ते 6 टन वजन घटून मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ऊसतोड मजुरांनी आता जाळल्याशिवाय ऊस तोडणारच नाही, अशी भूमिका घेतली असून, कारखाना व्यवस्थापनाची त्याला मूकसंमती असल्यासारखी स्थिती आहे.

अधिकचे नुकसान आणि कालावधी होऊन गेलेला उभा ऊस शेताबाहेर काढायचा तरी कसा? म्हणून हतबला शेतकरी आता थेट ऊसतोडणी मजुरांसमोरच फड पेटवून देऊ लागले आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने परिसरातील डोंगरदर्‍यांतील साप, विंचू, खेकडे ओढ्या-नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहत आले होते.

ते परिसरातील शेतामध्ये फिरताना अनेकदा दिसत असून, यामुळे ऊसतोडणी कामगारांच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून उसाचे उभे फड पेटवून देण्यात येत आहेत, असे सांगण्यात येत आहे. परंतु, त्यामुळे शेतकर्‍याच्या खिशावर डल्ला मारला जातोय, त्याचे कोणालाही 'सोयरसुतक' दिसत नाही. हिवाळा संपून दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढायला सुरुवात झाली आहे. तसेच, उन्हाळ्यात उसाला पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, या हेतूने शेतातील ऊस लवकर गाळपासाठी जावा, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा असते.

त्यामुळे ऊस घालविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. मोठ्या प्रमाणावर तुरे आल्याने उसाच्या वजनात मोठ्या प्रमाणावर वजन घटत आहे. यामुळेच अगोदरच आर्थिक संकटात सापडत असलेल्या शेतकर्‍यांच्या अडचणींचा गैरफायदा घेतला जात असल्याची चर्चा आहे. जास्त पावसामुळे डोंगरदर्‍यांतील साप, विंचू, खेकडे ओढ्या-नाल्यांत वाहून आल्याने ओढ्या-नाल्यांलगतच्या शेतात घोणस हा अतिविषारी साप या परिसरात ऊसतोडणी करताना अनेकांना मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत.

या परिसरातील उसाला मोठ्या प्रमाणात वाळलेले पाचट आहे. यामुळे ऊसतोड करण्याअगोदरच उसाचे फड पेटवावे लागत आहेत. मात्र, यामागे आमचा शेतकर्‍यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करण्याचा हेतू नसून, परिसरात असलेल्या साप तसेच जास्त प्रमाणात असलेले वाळलेले पाचट, यामुळे ऊसफड पेटवून तोडावे लागत आहेत, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर ऊसतोड मुकादमांनी दिली.

ऊसपाचट व्यवस्थापन अभियान हवे
मागील काही वर्षांपासून कृषी विभागाच्या माध्यमातून ऊसपाचट राखण्याचे फायदे लक्षात घेऊन याची माहिती शेतकर्‍यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी 'ऊसपाचट व्यवस्थापन अभियान' वाल्हे व परिसरात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र शेतकर्‍यांच्या उभ्या उसाच्या पिकाला जाळून तो तोडला जात असल्याने हे अभियान राबविण्याचा फायदा काय? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडत आहे.

मजूर, चालकांना वेगळे पैसेही द्यावे लागतात
ऊस तोडून नेण्यासाठी प्रतिएकरानुसार ऊसतोडणी मजुरांना वेगळे पैसे देण्याची वेळही ऊस उत्पादक शेतकर्‍यांवर आली आहे. ऊस वाहतूक करणार्‍या ड्रायव्हरलाही दररोज 200 रुपये भत्ता द्यावा लागत आहे. असा केवळ तोडणी-वाहतुकीसाठी दररोज हजारो रुपये खर्च करण्याची वेळ ऊस उत्पादक शेतकर्‍यांवर आली आहे. याबाबत कारखाना प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

SCROLL FOR NEXT