पुणे

पुणे: उसाला तुरे आल्याने शेतकर्‍यांवर आर्थिक संकट, दौंडज परिसरातील ऊसउत्पादक शेतकरी चिंतेत

अमृता चौगुले

वाल्हे (पुणे): वाल्हे, दौंडज (ता.पुरंदर) परिसरातील ऊसउत्पादक उसाला मोठ्या प्रमाणावर येत असलेल्या तु-यांमुळे हतबल होत आहेत. वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे ऊस पिकांसह सर्वच पिकांवर विपरीत परिणाम होताना दिसत असून, यामुळे शेतकरीवर्गाला दिवसेंदिवस मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

वाल्हे, दौंडज, पिसुर्टी, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी परिसरांत तुर्‍याने उभ्या उसात पोकळी निर्माण होत आहे. परिणामी, उसाचे वजन पन्नास टक्के घटल्याचे शेतकरीवर्गाचे मत आहे. निसर्गाचा लहरीपणाच याला कारण असला, तरी ऊसतोडणी मात्र दिवसेंदिवस लांबत असल्याने संकटात भर पडत आहे. उसाच्या लागवडीनंतर त्याची तोडणी साधारण 15 ते 16 महिन्यांनी अपेक्षित असते. मात्र, साखर कारखानदार ही तोडणी दोन – तीन महिने लांबणीवर टाकतात. त्यामुळे उसावर तुरे उगवतात व उभ्या उसाला पोकळ करतात. परिणामी, उसाच्या वजनात किमान पन्नास टक्क्यांनी घट होते. मात्र, यामध्ये साखरेची मात्र शंभर टक्के निर्मिती होते, असे ऊसउत्पादक शेतकरीवर्गाचे मत आहे. साखर कारखान्याकडून ऊसतोडणीची वाट शेतकरीवर्ग पाहात आहेत.

शेतकरी अतिवृष्टीच्या संकटातून सावर असताना, आता वातावरणातील बदलानेही त्याच्यापुढील समस्या वाढत्र आहेत. तोडणीला आलेला ऊस कारखाना तोडून घेत जात नसल्याने, शेतकरी दुहेरी संकटात अडकला आहे. परिसरातील बहुतांश शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात ऊसलागवड केली आहे. आता सर्वांपुढेच हे संकट उभे राहिल्याने यंदा परिसरातील आर्थिक उलाढालीवर विपरीत परिणामाची शक्यता निर्माण झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT