पुणे

वालचंदनगर : उसाचा फड पेटवल्याशिवाय होत नाही तोडणी

अमृता चौगुले

वालचंदनगर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आपल्या शेतातील ऊस गाळपासाठी लावताना ऊसतोडणी कामगारांना प्रतिएकर किमान पाच ते दहा हजार रुपये द्यावे लागत आहेत. याशिवाय उसाचा फड पेटवून दिल्याशिवाय ऊसतोड होत नाही. त्यामुळे या भागातील ऊसउत्पादक शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे.

गेल्या दोन वर्षांपासून या परिसरात उसाच्या क्षेत्रात प्रचंड वाढ झाली असून, गावोगावी शेकडो हेक्टर ऊस आहे. चालू वर्षी या भागातील साखर कारखाने सुरुवातीपासूनच पूर्ण क्षमतेने सुरू झाले. मात्र, या वर्षी मोठ्या प्रमाणावर ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्याच उपलब्ध झाल्या नाहीत. परिणामी, उसाचे उत्पादन वाढले असताना मजुरांची टंचाई निर्माण झाली. साहजिकच शेतकर्‍यांच्या शेतात उभा असलेला ऊस गाळपासाठी तोडणी होण्यास विलंब होत आहे. सध्या कारखान्यांचे हंगाम शेवटच्या टप्प्यात आहेत.

उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची आपला ऊस गाळपासाठी पाठवण्यासाठी धडपड सुरू आहे. याच संधीचा फायदा उठवत विविध कारखान्यांसाठी ऊस तोडणी करत असलेल्या मजुरांनी आता शेतातील ऊस तोडण्यासाठी अलिखित अटी व शर्ती घातल्या आहेत.

त्यामध्ये प्रामुख्याने उसाचा फड तोडण्यासाठी शेतकर्‍यांना प्रतिएकर पाच ते दहा हजार रुपये मोजावे लागत आहेत. शिवाय बर्‍याच ठिकाणी हिरवागार असलेला ऊस अगोदर पेटवून दिला तरच मजूर ऊस तोडण्यास तयार होत आहेत. त्यामुळे जळीत झालेल्या उसाला कारखान्याकडून सुमारे 200 रुपये बाजारभाव कमी मिळतो आहे.

साहजिकच शेतकर्‍याच्या शेतातील ऊस गाळपासाठी कारखान्यापर्यंत जाण्यापूर्वीच प्रतिटन किमान 300 ते 400 रुपये शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. म्हणजे उसाला कारखाना जरी प्रतिटन 2300 रुपये बाजारभाव देत असला, तरी प्रत्यक्षात शेतकर्‍याच्या हातात 1900 ते 2000 रुपये एवढाच बाजारभाव मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत असून, याबाबत कोणताही कारखाना प्रशासन दखल घेत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

काहीही असू द्या, पण ऊस गाळपासाठी जाऊ द्या
याबाबत आमच्या प्रतिनिधीने काही ऊस उत्पादक शेतकर्‍यांशी चर्चा केली असता त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आमच्या शेतातील ऊस गाळपासाठी जाणे महत्त्वाचे असल्याने आता पिळवणूक होत असली तरी नाइलाज आहे. याबाबत कारखान्याच्या संचालक मंडळाकडे तक्रार करावी, तर शेतातील ऊस शेतातच उभा राहण्याची भीती आहे. त्यामुळे आमचे तोंड दाबले असून, बुक्क्यांचा मार खावा लागत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT