पुणे: केंद्र सरकारने एप्रिल महिन्यासाठी 23.50 लाख टन साखर कोटा खुला केला आहे. शिवाय, मार्चमधील शिल्लक साखर कोट्यास 10 एप्रिलपर्यंत विक्रीस मुदतवाढ दिली आहे. उन्हाळ्यामुळे साखरेला राहणार्या वाढत्या मागणीमुळे घोषित केलेला कोटा अपुरा असल्याने साखरेचे दर तेजीत राहण्याचा अंदाज घाऊक बाजारपेठेतून वर्तविण्यात येत आहे.
केंद्राने मार्च महिन्यासाठी 23 लाख टन साखरेचा कोटा खुला केला होता. मागणीच्या तुलनेत घोषित कोटा कमी असल्यामुळे साखरेचे दर महिनाभर तेजीत स्थिरावले आहेत. शिवाय, मार्च महिन्यातील कोट्यातील साखर फारशी शिल्लक राहिली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे 10 एप्रिलपर्यंत जरी मार्चचा कोटा विक्रीला मुदतवाढ दिलेली असली तरी त्याचा फारसा परिणाम साखर दरावर होणार नसल्याचे जाणकारांचे मत आहे.
लग्नसराई, यात्रा- जत्रा, उन्हाळ्यामुळे थंडपेय उत्पादकांची वाढती मागणी राहण्याची अपेक्षा आहे. सध्या घाऊक बाजारात एस् 30 ग्रेड साखरेचा प्रतिक्विंटलचा दर 4100 ते 4150 रुपये आहे. सध्या मार्च महिनाअखेर असल्याने बाजारात आर्थिक चणचण जाणवत आहे. त्यामुळे सध्या साखरेला मागणी कमी असल्याचे सांगण्यात आले. मात्र, एप्रिल महिन्याच्या कोट्यतील साखर विक्रीस सुरुवात होताच साखरेच्या निविदा उंचावण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे साखरेचे दर क्विंटलला 25 ते 50 रुपयांनी वाढण्याचा अंदाजही वर्तविण्यात येत आहे.