पुणे

12 जानेवारीपासून साखर परिषद; नितीन गडकरी, शरद पवार राहणार उपस्थित

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) मध्ये 'जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता : आव्हाने आणि संधी' या संकल्पनेवर दि. 12 ते 14 जानेवारी या कालावधीत तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद व प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. परिषदेसाठी 27 देशांतील तज्ज्ञ, अडीच हजार उद्योजक आणि दीड लाखाहून अधिक शेतकर्‍यांची उपस्थिती अपेक्षित आहे. परिषदेच्या 12 जानेवारीला होणार्‍या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, अध्यक्षस्थानी व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार आहेत, अशी माहिती सहकारमंत्री व व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी मांजरीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

परिषदेच्या पहिल्या दिवशी 10 देशांतील नामवंत शास्त्रज्ञ त्यांच्या देशात झालेल्या ऊसपिकावरील संशोधन आणि साखर उद्योगाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, ऊस आणि साखर उद्योगाला चालना देणारे कृषी आणि तांत्रिक विषयांशी निगडित 13 सत्रांमध्ये एकूण 63 व्याख्याने आयोजित केली आहेत. साखर उद्योगातील जागतिक स्तरावर आर्थिक शिस्त आणि व्यवस्थापन या विषयावर चर्चा होणार आहे. तांत्रिक सत्रात ग्रीन हायड्रोजन, साखर उद्योगातील अभियांत्रिकी व प्रक्रिया, बायोइथेनॉल आणि साखर कारखान्यांमध्ये पर्यावरणीय स्थिरता, यावर सादरीकरण होईल. कृषी सत्रात ऊसजातींची निर्मिती, शाश्वत जमीन सुपीकता, आधुनिक सिंचनपध्दती, ऊसपिकाला पूरक असे शर्कराकंद, जिवाणू खते, रोग आणि किडींचे व्यवस्थापन, आधुनिक लागवड पध्दतीवर चर्चा होईल.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रदर्शनात देश-परदेशातून एकूण 273 प्रायोजकांनी सहभाग घेतला आहे. या प्रदर्शनामध्ये साखर कारखाने, आसवनी, सहवीज प्रकल्पांसाठी लागणार्‍या यंत्रसामग्रीचे उत्पादक, शेतकर्‍यांसंबंधी कृषी अवजारे, बियाणे, निविष्ठा कंपन्यांचे नवनवे तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात येणार आहे. ग्रीन हायड्रोजनची निर्मिती करण्याची संधी साखर उद्योगांना असून याच अनुषंगाने संस्थेमार्फत ग्रीन हायड्रोजन निर्मितीचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प बघावयास मिळणार आहे.

पंतप्रधानांच्या दौर्‍यामुळे मुख्यमंत्री येणार नाहीत

व्हीएसआयच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार होते. मात्र, 12 जानेवारी रोजीच्या उद्घाटनादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नियोजित झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री परिषदेला येणार नसल्याची माहिती व्हीएसआयचे सल्लागार शिवाजीराव देशमुख यांनी दिली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT