पुणे : राज्यात बैलगाडीतून साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक करताना बैलांना क्रूरतेची वागणूक देण्यात येऊ नये, अशी महत्त्वपूर्ण सूचना राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांना नुकत्याच दिल्या आहेत. बैलांवर क्षमतेपेक्षा जास्त वजन लादू नये तसेच सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर पशुधनाची पायी ने-आण करू नये. सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर बैलगाडीसाठी वजनकाटा बंद ठेवावा, असेही त्यांनी म्हटले आहे.(Latest Pune News)
प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत केंद्र सरकारचा अधिनियम 1960 अंतर्गत कारवाई केली जाते. प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत ’दी ट्रान्स्पोर्ट ऑफ ॲनिमल्स ऑन फूट रुल्स 2001’ व ’दी प्रिव्हेंशन ऑफ क्रुल्टी टू ड्रॉट ॲण्ड पॅक ॲनिमल्स रुल्स, 1965’ अंतर्गत काही बाबी अधिसूचित केलेल्या आहेत.
महत्त्वाच्या सूचना
जनावरांना दिवसभरातून नऊ तासांहून अधिक काळ वाहतूक करू देऊ नये.
तापमान 37 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल, अशा ठिकाणी दुपारी 12 ते 3 वेळेत विश्रांती आवश्यक.
जनावरे (बैल) 30 किलोमीटर प्रतिदिवस किंवा 8 तास आणि खाण्या-पिण्यासाठी 4 किलोमीटर प्रतिदोन तास या पलीकडे प्राण्यांची पायी ने-आण करता येणार नाही.
प्राण्यांना उगीच वेदना व यातना होतील अशा बाबींविषयी दंड व कारावासाची शास्ती नमूद आहे.
जास्त वय असलेल्या बैलांना विश्रांती आवश्यक
आजारी, जखमी, कुपोषित आणि जास्त वय असलेल्या बैलांचे स्वास्थ्य उचित राहावे, यासाठी त्यांना सक्तीची विश्रांती देण्यात यावी. यासाठी स्थानिक पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने कारखाना परिसरात एक पशुवैद्यक व एका सहाय्यकाची सेवा उपलब्ध करून घ्यावी, असेही साखर आयुक्तांनी म्हटले आहे.