मांडवगणफराटा, पुढारी वृत्तसेवा: तांदळी (ता. शिरूर) येथील शेतकर्याने ड्रॅगन फ्रूटचे कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याची किमया केली आहे. मुंबई, पुणे आदी बाजारपेठेत या फळांना मोठी मागणी आहे. शिरूर तालुक्यातील पूर्व भागात अनेक शेतकरी हे भीमा व घोड नदीच्या पाण्यावर अवलंबून असतात. पाण्याची मुबलकता असल्याने ते उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. मात्र तांदळी येथील शेतकरी सुरेश रोहिदास गदादे यांनी ड्रॅगन फ्रूटशेतीचा अनोखा प्रयोग राबविला अन् यशस्वीही करून दाखविला आहे. कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळवले. सुरेश गदादे यांनी 2017 साली दोन एकर क्षेत्रात रेड व्हाईट या जातीच्या ड्रॅगन फ्रूटची लागवड केली होती. यासाठी 25 रुपयेप्रमाणे रोपे विकत आणली.
पूर्व मशागत करताना नांगरट करून एकरी 5 ट्रेलर शेणखत टाकले. त्यानंतर बेड पाडून दोन टप्प्यात लागवड केली. खतनिर्मिती व उन्हापासून संरक्षणासाठी तागाची पेरणी केली. संपूर्ण लागवडीनंतर कमीत कमी रासायनिक खतांचा वापर केला. ठिबक सिंचनमधून पाण्याची बचत करत विद्राव्य खतेही सोडली. माळरान व निचरा होणा-या जमिनीची त्यांनी निवड केली. लागवड करताना 7 फूट लांब व 12 फूट रुंद अशा पद्धतीने ड्रॅगन फ्रूट पिकाची लागवड केली. सिमेंट खांबाचा वापर करून प्रत्येक खांबाला 4 रोपे याप्रमाणे लागवड केली. एक वर्षानंतर लोखंडी ब्रॅकेट बनवून त्यावर मोटरसायकल टायरचा वापर केला. रेड व्हाईट या जातीची निवड केली. एकरी 5 ट्रेलरप्रमाणे शेणखताचा वापर केला. रासायनिक खताचा वापर या पिकासाठी कमी होत असून या पिकाला औषध फवारणीची गरज नाही. उन्हाळ्यात पंधरा दिवसांनी पाणी लागते.
आतापर्यंत एकरी साडेतीन लाख रुपये खर्च आल्याचे गदादे यांनी सांगितले. एका वर्षात पीक येण्यासाठी सुरवात होते, मात्र दुसर्या वर्षी उत्पन्न चांगले मिळते. साधारण पाच महिने या पिकाची तोडणी सुरू असते. बागेसाठी बोअरवेलच्या पाण्याचा गदादे वापर करतात. गदादे यांनी उत्पादन घेण्याबरोबरच आपल्या शेतातील ड्रॅगन फ्रूटची विक्री स्वत: च्या कृष्णाई ड्रॅगन फ्रूट फार्म या नावाने केली आहे. या कामात गदादे यांना पत्नी स्मिता व वडील रोहिदास गदादे हे मदत करत असतात. गदादे यांना यावर्षी या पिकातून चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.
एका झाडाला साधारण 20 किलो फळे सध्या निघत आहेत. दोन एकरात 2021 साली 12 लाख 50 हजारांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा 30 टन एवढे उत्पादन मिळेल, अशी गदादे यांना आशा आहे. या वर्षी गदादे यांनी पुन्हा नव्याने अर्धा एकर क्षेत्रात जंबो रेड, जंबो इलो या जातीची लागवड केली आहे