मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शिनोलीचे (ता. आंबेगाव) तरुण शेतकरी महेश बोर्हाडे यांनी 12 एकरात जिरेनियम पिकाची यशस्वीरीत्या लागवड केली आहे. संपूर्णपणे जैविक पद्धतीने भरघोस उत्पादन घेतले आहे. सेंद्रिय खते, ठिबक सिंचनचा वापर ही त्यांच्या शेतीची वैशिष्ट्ये ठरली आहेत. कोरोना काळात मुंबई येथील बँकेतील नोकरीचा राजीनामा देऊन ते आपल्या गावी स्थलांतरित झाले.
जिरेनियम या पिकामार्फत लाखो रुपयांची कमाई केली आहे. एकदा या पिकाची लागवड केल्यानंतर वर्षातून तीनवेळा कापणी करून 3 वर्षे यापासून उत्पादन मिळविता येते. यासाठी एकरी 70 ते 80 हजार रुपयांचा खर्च येतो व 2 लाखांपर्यंत नफा मिळू शकतो. पारंपरिक पिकापेक्षा चौपट नफा देणारे हे पीक घेतल्यास शेतकर्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यास नक्कीच मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
फक्त जिरेनियम रोपविक्री हा उद्देश न ठेवता बोर्हाडे हे अभ्यासपूर्ण व शास्त्रोक्त पद्धतीने लागवड कशी करावी, विक्री कुठे व कशी करावी, मार्केटिंग कसे करावे, या सर्व गोष्टींचे सखोल मार्गदर्शन अगदी मोफत करतात. महाराष्ट्र तसेच देशातील अनेक ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. आजवर अनेक मान्यवर, युवा शेतकरी, कृषी विभागातील अधिकार्यांनी शिनोली येथील प्रकल्पाला भेट दिली आहे.
लागवडीपासून पीक कापणीपर्यंत संपूर्ण साहाय्य तसेच जिरेनियम पाल्यासाठी योग्य हमीभाव देण्याचा प्रयत्न ते करतात. पिकाची संपूर्ण माहिती, योग्य व्यवस्थापन पद्धती याबद्दलचे मार्गदर्शन हवे असल्यास 9890591491 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे बोर्हाडे सांगतात.
जिरेनियम ही एक सुगंधी आणि औषधी वनस्पती आहे. वनस्पतीच्या पाल्यापासून निघणार्या तेलाचा वापर अत्तर, शाम्पू, अगरबत्ती, सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मितीमध्ये होतो. तेलाला भारतामध्ये दर वर्षी 200-300 टनांची मागणी असून, सद्य:स्थितीला केवळ 10-20 टनांची निर्मिती होते. कमीत कमी देखभाल खर्चात जास्तीत जास्त नफा देणारे हे पीक आहे. एक टन पाल्यापासून 1 किलो तेल निघते, ज्याचा दर 12,500 ते 15,000 रुपयांपर्यंत मिळतो, अशी माहिती बोर्हाडे यांनी दिली.