सासवड: दिवसेंदिवस शेती करताना येणार्या अडचणी, नैसर्गिक समस्या, शेतीमालाला योग्य भाव न मिळणे, अशा गोष्टींमुळे शेतकरी अन्य शेतीपूरक व्यवसायांकडे वळाले आहेत. यामध्ये मत्स्यपालन व्यवसायाकडे शेतकर्यांचा कल वाढला असून, त्यातून ते चांगल्या प्रकारचे पैसे मिळवत आहेत. वनपुरी (ता. पुरंदर) गावातील 14 तरुणांना मत्स्यशेतीत यश मिळाले आहे.
वनपुरी हे पुरंदर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गाव आहे. या गावातील 14 तरुण शेतकर्यांनी 4 वर्षांपूर्वी शेतकरी उद्योगसमूह गट बनवला होता. पण पाणी फाउंडेशनच्या फार्मर कपमध्ये सहभागी झाल्यावर त्यांना एक नवी दिशा मिळाली. या तरुण शेतकर्यांनी पाण्याचा योग्य वापर आणि पूरक व्यवसायाचा यशस्वी प्रयोग करत गटशेतीला एक नवीन दिशा दिली.
यासाठी गटाने दीड लाख वर्गणी दिली व दीड लाख कृषी विभागाचे अनुदान मिळाले. त्यातून यशस्वीपणे 3 शेततळी उभारली. यामुळे बोअरवेल, विहिरींमध्ये पाणी असेपर्यंत त्यावर आणि नंतर या तळ्यातील पाण्यावर शेती केली जाते.
सोबत या पाण्याचा अतिरिक्त फायदा कसा करता येईल, याचा विचार गटाने सुरू केला आणि मत्स्यशेतीचा पर्याय समोर आला. सोबत गटशेती करताना ऐक्याने केलेल्या प्रयत्नांचे महत्त्व कळले आणि या एकजुटीला त्यांनी एक पाऊल पुढे नेले. पावसाचे पाणी साठवण्यासाठी शेततळे तयार करण्याची त्यांनी योजना आखली, जेणेकरून सांडपाण्यावर त्यांची शेती अवलंबून राहणार नाही.
प्रयोग म्हणून मत्स्यशेती सुरू केली. कटला आणि रोहू जातीची मासे तळ्यात सोडली. रोहू माशांची वाढ चांगली झाली. आत्तापर्यंत 200 किलो मासे विकले. यातून 36 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. अजून मासे बाकी आहेत. हा आमचा पहिला प्रयोग असल्याने 34 हजार 500 रुपये खर्च झाला. आता आम्ही दोन शेततळी उभारली असून, या तिन्ही तळ्यांमध्ये चिलापी मासे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.- प्रशांत कुंभारकर, मत्स्य उत्पादक
मत्स्यशेतीसाठी सरकार शेतकर्यांना प्रोत्साहन देते. केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी भारत सरकार शेतकर्यांना 60 टक्के अनुदान देत आहे. त्यामुळे ज्या शेतकर्यांकडे तलाव नाहीत, ते सुद्धा मत्स्यपालन व्यवसाय सहज करू शकतात.- नामदेव कुंभारकर, माजी सरपंच, वनपुरी