रावणगाव: खडकवासला धरण कालव्यावर मळद (ता. दौंड) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या आऊटलेटमधून ओढ्याला पाणी सोडण्यात आल्याने रावणगावसह मळद, नंदादेवी, खडकी यासह स्वामी चिंचोली या पाच गावांना पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे. आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नातून शेतकर्यांच्या मागील 15 वर्षांच्या मागणीला अखेर यश आल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.
रावणगाव परिसरातील शेतीला खडकवासला धरण कालव्यावरील 32 ते 35 या तीन फाट्यांद्वारे पाणी सोडले जाते. यामधून रावणगाव, मळद, नंदादेवी, खडकी आणि स्वामी चिंचोली या गावांना पाणी दिले जाते.
मात्र, उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई असल्यास टेलपर्यंत पाणी पोहचण्यास अडथळा येत होता. परिणामी, पिके जळून दरवर्षी या भागातील शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. मागील 15 वर्षांपासून या भागातील शेतकर्यांची ओढ्यावर आऊटलेट करा, अशी मागणी होती.
आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नातून मळद येथे राज्य शासनाच्या वतीने 54 लाख रुपये खर्च करून खडकवासला धरण कालव्यावर मळद येथे आऊटलेट बांधण्यात आले. यामधून शुक्रवारी (दि. 28) ओढ्याला पाणी सोडण्यात आले.
शनिवारी पाणी शेवटच्या टोकापर्यंतच्या स्वामी चिंचोली परिसरात पोहचल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले. यामुळे ओढ्यावरील जवळपास 20 बंधारे पाण्याने पूर्ण दाबाने भरणार आहेत. ओढ्याला आलेल्या पाण्याचे रावणगाव ग्रामस्थांनी पूजन करत जल्लोष केला.