नवी सांगवी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःमधील कला गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी रिल्स, फोटोशूट, ब्लॉग, वेबसिरीज, नृत्य, गाणी, शुटींग करून तरुणाईकडून समाज माध्यमाकडे करिअर म्हणून पाहिले जात आहे. निसर्गाच्या सान्निध्यात, चांगल्या स्थळांची निवड करून या क्षेत्रातील अनेक जण समाज माध्यमांद्वारे या क्षेत्रात काम करत आहेत. पिंपळे गुरव, सांगवी परिसरातील उद्यान, रस्ते, चौकांत तरुण रिल्स काढताना दिसत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील उपनगरे स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत स्मार्ट झाली आहेत. यात सिमेंट रस्ते, रस्त्यांचे सुशोभीकरण, मोठी उद्याने, जलतरण तलाव, मोठ्या इमारती भव्य सोसायट्या यामुळे उपनगरांचा जुना चेहरा बदलला आहे. पावसाळ्याचे दिवस व रस्ते उद्यानातील फुललेली फुलझाडे, हिरवळ यामुळे आपसुकच या क्षेत्रातील मंडळींना उपनगरांतील अशा ठिकाणांची भुरळ पडल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे.
राजमाता जिजाऊ उद्यानात गर्दी
पिंपळे गुरव येथे दुबईच्या धर्तीवर साकारण्यात आलेले राजमाता जिजाऊ उद्यानात विविध रंगीबेरंगी देशी विदेशी झाडे, फुलझाडे यांनी परिसर विविध रंगानी नटलेला आहे. रिल्स, फोटो शुटसाठी येथील उद्यान व परिसरात मोठ्या प्रमाणावर तरुणाई पाहायला मिळते. या परिसरातील भव्य इमारती, सिमेंट रस्ते, नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, जलतरण तलाव अशा ठिकाणी फोटोशूट व रिल्ससाठी फिरकताना तरुणाई पाहायला मिळते.
हिरवळ असणारे उद्यान तरुणाईचे आकर्षण केंद्र
जुनी सांगवी येथे मुळा काठावर असलेले छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात नदीकाठचा परिसर व परिसरात असलेली पूर्वीची जुनी मोठी झाडे सामावून घेण्यात आली आहेत. याचबरोबर विविध देशी विदेशी फूल झाडे, हिरवळ, पदपथ यामुळे पावसाळ्यात या उद्यानाचे रूपडे बदललेले असते. या उद्यानातही कलाकार मंडळी पाहायला मिळतात. पिंपळे निलख येथे मुळा नदीच्या काठावर सुमारे पाच एकर जागेवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे शहीद अशोक कामटे उद्यान आहे. भव्यता, निसर्गरम्य वातावरण, देशी झाडे, फुलझाडे व आकर्षक हिरवळ असणारे हे उद्यान सर्वसामान्यासह तरुणाईचे आकर्षण केंद्र आहे.
येथील लता मंडप, सेंट्रल पार्क, विविध फुलझाडे, विद्युत रोषणाई व एलईडी दिवे, बारा मीटर उंच मोमेंट कॉलम आदींनी उद्यानाची संकल्पना ही आधुनिक आहे. त्यासाठी नैसर्गिक व पारंपरिक पद्धतीचे मिश्रण असल्याने उद्यानाच्या सौंदर्यामुळे कलाकार व फोटोशुटसाठी या उद्यानाला युवा तरुणांची मोठी पसंती पाहायला मिळते.
स्वतः मधील कलागुण समाजासमोर सादर करण्यासाठी पूर्वी केवळ नाटक हे माध्यम होते. आता सोशल मीडिया हे मोठे व्यासपीठ निर्माण झाले आहे. यातून अनेकजण खटाटोप करत असतात. आपल्या सभोवताली असणार्या वातावरणाचा चांगला उपयोग करून चांगल्या थीमला नागरिक पसंत करतात. यामुळे याकडे करिअर म्हणून ही पाहिले जात आहे.
– सुवर्णा चोंधे, अभिनेत्री
आजची तरुणाई छोटे-छोटे रिल्स तयार करून कमी खर्चात स्वतःमधील आवड जोपासत असतात. सोशल मीडिया हे आता मोठे व्यासपीठ झाले आहे.
– संजय मराठे, शॉर्ट फिल्म निर्माता
जेव्हा आम्ही व्हिडीओ शूट करतो त्यावेळी खूप अडचणी येत असतात. शूट करण्यासाठी जागा शोधणे, साहित्य, सामग्री सतत जवळ बाळगावी लागते. परिसरात शूट करीत असताना गर्दी करून बघ्याची भूमिका घेत असणार्या नागरिकांचा नाहक त्रास होत असतो. या वेळी अनेकजण आम्हाला वेडे समजतात. आम्ही जे करीत असतो त्याला टाइमपास म्हणतात.
– पंकज सोहनी, कोरिओग्राफर
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.