पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कनिष्ठ कर्मचार्यांनी तयार केलेल्या प्रस्तावावर वरिष्ठ अधिकारी फक्त सह्या करून त्या मंजुरीसाठी पाठवतात. यापुढे स्पष्ट अभिप्रायासह फायली मान्यतेसाठी सादर कराव्यात, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी अधिकार्यांना दिले आहेत. स्पष्ट अभिप्राय देण्यास टाळाटाळ केल्यास कार्यालयीन शिस्तीचा भंग म्हणून कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांचे विभागप्रमुख किंवा नियंत्रण अधिकारी यांच्यामार्फत महापालिका कामकाजाशी संबंधित विविध प्रकल्प, प्रशासकीय, तांत्रिक तसेच, अन्य कामकाजाबाबतच्या फाईली आयुक्त यांच्याकडे निर्णयार्थ सादर केल्या जातात.
संबंधित विभागातील कनिष्ठ कर्मचार्यांमार्फत सादर केलेल्या प्रस्तावावर संबंधित विभागातील पर्यवेक्षकीय अथवा वरिष्ठ अधिकार्यांमार्फत कोणत्याही प्रकारचे स्पष्ट शेरे किंवा अभिप्राय नमूद न करता केवळ सह्या केल्या जातात. तसेच, 'आदेशार्थ' असा उल्लेख करून स्पष्ट अभिप्राय किंवा मत देण्याचे टाळतात. ही बाब कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारी आहे. त्यामुळे प्रशासकीय निर्णय घेण्याबाबत अडचणी निर्माण होत आहेत. सर्व विभागप्रमुख व नियंत्रण अधिकारी यांनी मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवताना केवळ सह्या न करता प्रस्तावाबाबत स्पष्ट अभिप्राय व शेरे द्यावेत. स्पष्ट अभिप्राय न देता नुसती सादर केल्यास संबंधित अधिकार्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.