पुणे

विद्यार्थ्यांची ऑनलाइनला पसंती; तरी परीक्षा ऑफलाइनच

backup backup

महाराष्ट्र राज्य विद्यार्थी संघटनेने केले सर्वेक्षण; राज्यातील 3 लाख 50 हजार विद्यार्थ्यांचे घेतले मत

पिंपरी : वर्षा कांबळे : राज्यातील दहावी आणि बारावीच्या 80 टक्के विद्यार्थ्यांचा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याकडे कल असल्याचे महाराष्ट्र राज्य विद्यार्थी संघटनेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

तरीही राज्य सरकारने ही परीक्षा ऑफलाइनच घेण्याचा निर्णय घेतला आहे.दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेबाबत मत जाणून घेण्यासाठी संघटनेने सर्वेक्षण केले होते. यामध्ये ही माहिती समोर आली आहे.

कोरोना काळातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी ही संघटना काम करत आहे.यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी संघटनेने राज्यातील 36 जिल्ह्यांत गुगल फॉर्म पोहोचून हे सर्वेक्षण पूर्ण केले.

या सर्वेक्षणात 3 लाख 50 हजार विद्यार्थ्यांच्या सध्याच्या कोरोना परिस्थितीचा विचार करुन मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये बोर्ड परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी 80.6 टक्के विद्यार्थ्यांनी संमती दर्शविली आहे. तर 19.4 टक्के जणांनी ऑफलाइन परीक्षेची मागणी केली आहे.

या सर्वेक्षणमध्ये ऑनलाइन परीक्षेला एकीकडे पसंती दर्शवली आहे. तरी सुद्धा अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने 70 टक्के विद्यार्थी बोर्ड परीक्षा न देण्याचा विचार करत आहेत. तरीही शिक्षण विभागाने परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

शिवाय पेपर पॅटर्न, आणि अभ्यासक्रम सगळे आधीच ठरलेले असताना अचानक यामध्ये बदल करणे शक्य नसून त्यासाठी पुढे परिस्थिती पाहून शिक्षण तज्ज्ञांचे मत विचारात घेवून निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाचा शिक्षण विभाग किती गांभीर्याने विचार करते, हे पाहावे लागणार आहे.

"आम्ही 36 जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण केले. यामध्ये 70 टक्के विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नसल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिकविलेले कळले नसल्याचे म्हटले आहे. 11.3 टक्के विद्यार्थ्यांनी 'एमसीक्यू' पॅटर्न ला नकार दर्शविला आहे. 13.7 टक्के विद्यार्थ्यांनी 50-50 मत दर्शविले आहे. 80 टक्के विद्यार्थी वर्षभरात झालेल्या ऑनलाइन शिक्षणावर समाधानी नसल्याचे समोर आले आहे."
                         – अनिश काळभोर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विद्यार्थी संघटना

SCROLL FOR NEXT