पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. मात्र, जाधववाडी येथील उर्दू माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात अल्पसंख्याक विकास महासंघाचे अध्यक्ष रफिक कुरेशी यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे तक्रार केली आहे. नोव्हेबर महिना सुरू झाला तरी, या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, दप्तर, बूट, मोजे, रेनकोट व इतर साहित्य देण्यात आलेले नाही. या शाळेस वर्ग खोल्या नसल्याने सांस्कृतिक हॉलमध्ये विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे.
या शाळेच्या गैरसोयी दूर करून विद्यार्थ्यांना तत्काळ साहित्य पुरवावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या स्मारकाचा मुद्दा गेल्या नऊ वर्षांपासून रखडला आहे. ते स्मारक पिंपरी-चिंचवड शहरात लवकरात लवकर उभारण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.