पुणे

पुणे : बिबवेवाडीत पालकांचा जीव टांगणीला

अमृता चौगुले

बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा :  बिबवेवाडी परिसरात सध्या विविध विकासकामे सुरू असून, बांधकाम साहित्य, माती व राडारोडा इत्यादींची वाहतूक करणार्‍या अवजड वाहनांची रस्त्यांवर वर्दळ आहे, यामुळे नागरिकांसह शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी शाळा प्रशासन व पालकांकडून होत आहे.

बिबवेवाडी येथील पोकळे वस्तीजवळ स्मशानभूमीच्या परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत. याच भागात विद्यानिकेतन इंग्रजी माध्यम व पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळा आहे. या शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत परिसरातील रस्त्यांवरून बांधकाम साहित्य व राडारोडा करणार्‍या ट्रक, डंपर आदी अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या भागात तीव्र असल्याने अपघाताचा धोका आहे. यामुळे एखादी दुर्दैवी घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न पालक व नागरिकांनी केला आहे.  पालक धनंजय त्रिमल म्हणाले, 'स्मशानभूमीच्या परिसरातील अवजड वाहतुकीबाबत महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागालाही पत्र दिले आहे. पालकांना मुलांना शाळेत सोडताना व आणताना मोठी कसरत करावी लागत आहे.'

शाळेच्या आजूबाजूने मोठमोठी अवजड वाहने उभी केली जात आहेत. तसेच शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी अवजड वाहतूक बंद करण्याबाबत संबंधित बांधकाम विकसकांना पत्र दिले आहे. तरीदेखील अवजड वाहनांची वाहतूक सुरूच
असल्याने शाळा प्रशासनावर ताण येत आहे.
-सुनिता यादव, मुख्याध्यापिका, विद्यानिकेतन इंग्रजी माध्यम विद्यालय, बिबवेवाडी

बिबवेवाडीतील स्मशानभूमी परिसरात विविध शाळा आहेत. या भागात सुरू असलेल्या अवजड वाहतुकीची तातडीने दखल घेऊन वाहतूक पोलिस कर्मचार्‍यांची नेमणूक केली जाईल.
-विनायक साळुंखे, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, बिबवेवाडी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT