वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत 'गरीब विद्यार्थी शैक्षणिक मदत' हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधिर भागवत यांनी दिली. मावळ तालुक्याचा बराचसा भाग हा डोंगराळ स्वरुपाचा आहे, जिल्हा परिषदेच्या शाळेत अनेक विद्यार्थी हे गरीब कुटुंबातून येतात. शासनाकडून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके प्राप्त होतात, परंतू वह्या, पेन्सिल्स, स्केचपेन, कंपास, दप्तर, वॉटरबँग आदी शैक्षणिक साहित्य पालकांना विकत घ्यावे लागते.
अनेक पालकांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने विद्यार्थ्यांना या साहित्यापासून वंचित राहावे लागते, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होतो. त्यामुळे अनेक होतकरु विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात अडथळा निर्माण होतो. गरीब विद्यार्थी शैक्षणिक प्रगतीपासून वंचित राहू नये यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला असल्याचे भागवत यांनी सांगितले.
या उपक्रमांतर्गत पंचायत समिती मधील सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक, संघटनांचे पदाधिकारी, केंद्रप्रमुख हे आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून पंचायत समितीमध्ये पाच शैक्षणिक किट जमा करणार आहेत. प्रत्येक महिन्याला जमा झालेल्या या किटचे गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन वाटप केले जाणार आहे. दरम्यान, गट विकास अधिकारी सुधिर भागवत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कुसगांव केंद्राचे केंद्रप्रमुख मुकुंद तनपूरे यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी पाच शैक्षणिक किट पंचायत समितीला भेट दिले.
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना या उपक्रमातून लेखन साहित्य प्राप्त होणार आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांच्या सहकार्यातून स्वेच्छेने सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी लाभदायी ठरणार आहे. गरीब विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व त्यांच्या शिक्षणातील अडथळा दूर करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
– सुधीर भागवत, गटविकास अधिकारी, मावळ पंचायत समिती