File Photo  
पुणे

सिंहगड भागात पट्टेरी वाघ! रांजणे-पाबे घाटरस्त्यावर झाले दर्शन

अमृता चौगुले

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: सिंहगड किल्ल्याच्या पश्चिमेला असलेल्या रांजणे- पाबे घाटरस्त्यावर शुक्रवारी (दि. 23) रात्री साडेनऊच्या सुमारास पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. याआधीही पाबे परिसरातील शेतकर्‍यांनी जंगलात पट्टेरी वाघ पाहिला होता. यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंहगड परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. त्यानंतर आता पट्टेरी वाघ दिसून आल्याने गुराखी शेतकर्‍यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

दरम्यान, वनविभागाच्या पथकाने शनिवारी सकाळी घाटरस्ता व रस्त्याच्या परिसरातील जंगलात पाहणी केली. पट्टेरी वाघाच्या पाऊलखुणा, तसेच जंगलात वास्तव्य असल्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने सात दिवसांचे 'सर्चिंग ऑपरेशन' सुरू केले आहे. गेल्या वर्षीही पानशेतजवळील आंबी येथे दुर्मीळ पट्टेरी वाघाचा वावर असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. मात्र, वनखात्याच्या पथकाला वाघाच्या पाऊलखुणा सापडलेल्या नाहीत. त्यानंतर आता पुन्हा पट्टेरी वाघ जंगलात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रांजणे येथील शेतकरी माऊली दारवटकर हे मोटारीतून शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रांजणे -पाबे घाट रस्त्याने पुण्याकडे जात होते. त्या वेळी पाबे गावच्या हद्दीत पट्टेरी वाघ उभा असल्याचे दिसले. त्यामुळे घाबरून गाडी जागेवरच थांबवली. त्यानंतर अवघ्या पंधरा फूट अंतरावरून रस्ता ओलांडून हा वाघ जंगलात गेल्याचे दारवटकर यांनी सांगितले. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी पाबे परिसरातील शेतकर्‍यांनी पट्टेरी वाघ असल्याचे सांगितले. वेल्हे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लगुंटे यांच्या देखरेखीखाली वनविभागाने या परिसरात सर्चिंग ऑपरेशन सुरू केले आहे.

गवत वाढल्याने ठसे दिसेना
सततच्या पावसामुळे सर्वत्र गवत, झुडपे वाढली आहेत. तसेच पाऊलवाटांनीही पाणी वाहत आहे. त्यामुळे कोठेही वाघ, तसेच हिंस्र वन्यप्राण्यांच्या पायाचे ठसे सापडत नसल्याचे पुढे आले आहे. पानशेतजवळील आबी, पानशेत, रुळे भागात गेल्या महिनाभरात बिबट्याने शेळ्या, कुर्त्यांसह दहा जनावरांचा फडशा पाडला. मात्र, पाबे रांजणे भागात अद्याप कोणत्याही जनावरांचा हिंस्र वन्यप्राण्याने फडशा पाडला नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

पट्टेरी वाघाबाबत या वनविभागाला माहिती मिळाली. सिंहगड किल्ल्याच्या पश्चिमेला असलेल्या दुर्गम घाट, जंगलाच्या परिसरात पट्टेरी वाघाचे अस्तित्व अद्याप स्पष्ट झाले नाही. शनिवारी सकाळपासून वनपथकाने घटना स्थळ व परिसराची पाहणी केली. सततच्या पावसामुळे गवत, झुडपे वाढली असल्याने या वाघाच्या पायाचे ठसे दिसले नाहीत.
                                                       – बंडू खरात, वनरक्षक, पानशेत वनविभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT