पुणे: पीएमपी प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी नुकतीच महिला तक्रार निवारण समितीमध्ये फेररचना केली आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने एका एनजीओसह दिवंगत जनसंपर्क अधिकारी सतीश गाटे यांच्या जागी नवीन सचिवांची नियुक्ती केली आहे.
पीएमपीमधील लैगिंक छळ रोखण्यासाठी पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे व सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी या समितीमध्ये फेररचनेस मान्यता दिली.
या समितीच्या अध्यक्षपदी पीएमपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार, सचिवपदी प्रभारी जनसंपर्क अधिकारी किशोर चौहान, एनजीओच्या सदस्या लता सोनवणे, सदस्यपदी प्र. डेप्युटी चीफ अॅडमिन मॅनेजर मोहन दडस, लिपिक सुजाता आगरकर, वाहक जया राऊत, माधवी माने, स्वीपर वर्षा मुंढे, अशी नवीन समिती आहे.
शासन निर्णयानुसार समितीने कार्यवाही करावी
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायदा 2013 मधील कलम 4 (2) मधील तरतुदीनुसार पीएमपीतील महिला तक्रार निवारण समितीची फेररचना करण्यात येत आहे. गठित तक्रार निवारण समितीने महिलांच्या प्राप्त तक्रारींवर शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी, असे आदेश पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी काढले आहेत.
...म्हणून समिती आवश्यक
महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्र. मकचौ 2006/प्रक-15/मकक, मंत्रालय, मुंबई दि. 19 सप्टेंबर 2006 अन्वये शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये महिला कर्मचार्यांच्या लैंगिक छळवादाचे तक्रारीवर कार्यवाहीसाठी समिती नेमणे बंधनकारक आहे. त्यानुसार पीएमपीमध्ये ही तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे.