हिरा सरवदे
पुणे : रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या फांद्यांमध्ये रस्त्यावरील पथदिवे हरविल्याचे चित्र पौड फाटा-चांदणी चौक रस्त्यावर पाहायला मिळते. परिणामी, रस्त्यावर कुठे उजेड, तर कुठे अंधार दिसतो. या रस्त्यावरील मेट्रो स्टेशनच्या खाली मात्र प्रकाशदिवे रस्त्याच्या मध्यभागी असल्याने चांगला प्रकाश आहे.
एसएनडीटी-पौड फाटा ते चांदणी चौक यादरम्यानच्या रस्त्यावर महापालिकेने पथदिव्यांची चांगली प्रकाशव्यवस्था केली आहे. शहरातून चांदणी चौकमार्गे कोकण, बंगळुरू आणि मुंबईकडे ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर केला जातो. शहरातील प्रमुख रस्ता असल्याने हा रस्ता प्रशस्त आहे. याच रस्त्यावरून वनाज ते रामवाडी मेट्रो मार्ग असल्याने रस्त्यावरील दुभाजक इतर दुभाजकांपेक्षा मोठा आहे. त्यामुळे रस्त्यावरील बहुसंख्य पथदिवे दोन्ही बाजूच्या रस्त्याच्या कडेला लावण्यात आले आहेत.
एसएनडीटीजवळील सावरकर उड्डाणपुलावर दोन्ही बाजूंनी पथदिवे आहेत. संपूर्ण रस्त्यावर दोन्ही बाजूंना पदपथावर दिवे आहेत. कोथरूड डेपोपासून मेडी कॉर्नर चौकापर्यंत केवळ पाच खांब रस्त्याच्या मध्यभागी आहेत. याशिवाय या रस्त्यावरील आयडियल कॉलनी, आनंदनगर आणि वनाज मेट्रो स्टेशनच्या खाली मध्यभागी मेट्रो खांबांना दिवे लावल्याने चांगला प्रकाश पडतो. मात्र, ज्या ठिकाणी पदपथावर दिव्यांचे खांब उभे केले आहेत. यातील बहुसंख्य पथदिवे झाडांमध्ये हरविले आहेत.
पुणेकरांनो, पथदिव्यांच्या दिव्य स्थितीचे आणि सोसाव्या लागणार्या गैरसोयींचा आँखो देखा हाल 'टीम पुढारी'ने तुमच्यासमोर मांडला आहे. पुण्यात रात्री प्रवास करताना तुम्हाला काय त्रास सहन करावा लागतो? ते थोडक्यात 'पुढारी'ला 9823158113 या क्रमांकावर व्हॉट्सअॅपने कळवा आणि फोटोही पाठवा.