मिलिंद कांबळे :
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे स्मार्ट सिटीत रूपांतर होत असले तरी, भटक्या व मोकाट कुत्र्यांचा त्रास काही कमी होताना दिसत नाही. कुत्र्यांनी चावा घेतल्याने नागरिक जखमी होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शहरातील 70 हजार भटक्या कुत्र्यांपैकी 25 टक्के म्हणजे सुमारे 17 हजार 500 कुत्र्यांचे निर्बीजीकरण (नसबंदी शस्त्रक्रिया) करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. शहरात राहण्यास मोठी पसंती दिली जात असल्याने नागरिकीकरण झपाट्याने होत आहे.
शहराची लोकसंख्या 27 लाखांच्या पुढे आहे. चारी बाजूस दाट लोकवस्ती निर्माण होत आहे. तसेच, खाद्यपदार्थाचे स्टॉल व हॉटेल व्यवसाय तेजीत आहेत. नागरिक व हॉटेल व्यावसायिक शिल्लक व खरखटे अन्नपदार्थ फेकून देतात. कचराकुंड्या हटविल्या तरी, काही बेशिस्त नागरिक उघड्यावर कचरा व अन्न फेकून देतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना पुरेसा आहार मिळत असल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. निर्जन भागातून विशेषत: रात्रीच्या वेळी जात असताना ही मोकाट कुत्री नागरिकांवर धावून जातात. चावा घेतल्याने नागरिक विशेषत: लहान मुले जखमी होत आहेत. अशा घटना वाढल्या आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या आकडेवारीवरून एका वर्षात सुमारे 10 हजार जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे.
दुसरीकडे पालिकेच्या नेहरूनगर येथील नसबंदी शस्त्रक्रिया विभागात दररोज 15 कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जात आहे. त्यात 85 टक्के प्रमाण हे मादी कुत्रीचे आहे. पशुवैद्यकीय विभागाकडे असलेले तोकडे मनुष्यबळ, कमी संख्येचे कुत्र्यांचे पिंजरे व सुविधा आदी कारणांमुळे नसबंदी शस्त्रक्रियेचे प्रमाण कमी आहे. प्रत्यक्ष नसबंदी न करता कागदे रंगवून गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. शहरातील 75 टक्के कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया झाल्याचे गृहीत धरल्यास उर्वरित 17 हजार 500 कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी वेगात पावले उचलणे गरजेचे आहे.
भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या नियमानुसार प्रत्येक 40 माणसांमागे एक कुत्रा असे गणित आहे. त्यानुसार 27 लाख लोकसंख्येचा विचार करता 67 हजार 500 इतकी कुत्री म्हणजे सुमारे 70 हजार कुत्री शहरात असल्याचा अंदाज आहे. प्राणी व पक्ष्यांसाठी आवश्यक सेवा व सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थानी उपलब्ध करून देण्याची अट आहे.
पालिकेच्या वतीने प्राण्यांवर उपचार करण्यासाठी नेहरूनगर येथे रूग्णालय सुरू करण्यात आले आहे. तेथे पाळीव व भटक्या कुत्र्यांसह मांजर, बैल, गाय, घोडा, गाढव, डुकर, शेळी, मेंढी, म्हैस अशा प्राण्यांवरही उपचार करण्यात येत आहेत. दररोज 12 ते 13 शस्त्रक्रिया केल्या जात असून, ओपीडीमध्ये 70 ते 80 प्राण्यांवर उपचार केले जात आहेत. तसेच, पाळीव कुत्रा व मांजर यांना ऑनलाइन परवाना दिला जात आहे. जखमी कुत्रा, मांजर व इतर प्राणी आढळून आल्यास 7028714111 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
नेहरूनगरच्या केंद्रावर कुत्र्यांच्या पिंजर्यांची संख्या आठवड्याभरात 58 केली जाणार आहे. नंतर आणखी 70 पिंजरे बांधण्यात येणार आहेत. सध्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून दररोज 15 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली जात आहे. त्यासाठी पालिकेस काही खर्च येत नाही. शस्त्रक्रिया केल्यानंतर कुत्र्याच्या कानास छेद दिला जातो. कुत्री पकडण्यासाठी प्राणीमित्रांचे सहाय घेण्यात येत आहे. लवकरच शस्त्रक्रियेची संख्या दररोज 30 ते 35 वर नेण्यात येणार आहे. महिन्याला 1 हजार ते 1 हजार 100 आणि वर्षाला 11 ते 12 हजार शस्त्रक्रियेचे नियोजन आहे.
पालिकेचे डॉक्टर व मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यात येत आहेत. त्यामुळे पालिकेची यंत्रणा सक्षम होऊन कुत्री पकडणे, शस्त्रक्रिया करणे व ती पुन्हा सोडून देणे ही सर्व कामे पालिकेमार्फत केले जातील. शहरातील 100 टक्के कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया व लसीकरण करण्याचे ध्येय आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, असा दावा पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांनी केला आहे.