पुणे: शहरात भटक्या श्वानांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांना धोक्याला सामोरे जावे लागत आहे. मात्र, या विषयावर कारवाई करण्याचे ठरवले तरी प्राणिमित्र त्याला तीव्र विरोध करतात, परिणामी, महापालिकेला अनेकदा माघार घ्यावी लागते.
सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात दिलेल्या आदेशांचा सविस्तर अभ्यास करून पुणे महापालिकेने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली आहे. भटक्या श्वानांमुळे निर्माण झालेल्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन दिले. (Latest Pune News)
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहर आणि उपनगरांत रात्रीच्या वेळी झुंडीत फिरणारे श्वान दुचाकीस्वार, पादचारी तसेच सकाळी फेरफटका मारणार्या ज्येष्ठ नागरिकांवर धावून जात हल्ले करतात. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, दररोज सरासरी 80 नागरिकांना भटके श्वान चावा घेतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार श्वानांवर कारवाई करावी, अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, या श्वानांना पकडून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. त्याचबरोबर रस्त्यावर प्राणिमित्रांकडून दिल्या जाणार्या खाद्यामुळे श्वानांचा त्रास वाढतोय, त्यामुळे अशा प्राणिमित्रांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
भटक्या श्वानांची संख्या कमी करण्यासाठी नसबंदी प्रक्रियेला गती देणे आवश्यक आहे. या कामासाठी नेमलेल्या संस्थेने पारदर्शकपणे आकडेवारी जाहीर करावी, तसेच नसबंदी केलेल्या श्वानांच्या गळ्यात ठळक ओळख पटेल असा पट्टा घालावा, अशी मागणी खर्डेकर यांनी केली.
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या
भटक्या श्वानांमुळे झालेल्या चाव्याच्या घटना, त्यात जखमी व रेबिज झालेल्या रुग्णांची आकडेवारी राज्य शासनाकडे पाठवावी, अशीही मागणी करण्यात आली. खर्डेकर म्हणाले की, महापालिकेने या समस्येकडे तातडीने गांभीर्याने लक्ष देऊन पुणेकरांना दिलासा द्यावा.