नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : पुणे – सातारा महामार्गावरील किकवी (ता. भोर) येथील भुयारी मार्ग वेळेत न केल्याने झालेल्या अपघातात परिसरातील 12 जण दगावले आहेत. काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. भुयारी मार्ग होण्यासाठी सतत पाठपुरावा केला. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी दिशाभूल करून उडवाउडवीची उत्तरे देतात. दिलेल्या मुदतीत जर कामे झाली नाही, तर पुन्हा तीव— आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांनी दिला.
किकवी येथील सातारा महामार्गावरील प्रलंबित भुयारी मार्ग व सेवा रस्त्याचे काम सुरू न केल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत बाठे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. 4) महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रकाश तनपुरे, माजी सभापती सुनीता बाठे, गणेश निगडे, किकवीचे सरपंच नवनाथ कदम, नवनाथ भिलारे, भास्कर सपकाळ, नारायण भिलारे, किरण घारे, काळूराम महांगरे, रामकृष्ण मोरे, मनोज निगडे, दादा मोरे आदींसह शालेय विद्यार्थी, विविध गावाचे सरपंच व जवळपास पाचशे ग्रामस्थ उपस्थित होते.
किकवीमध्ये आठवडे बाजार, जनावरांचा बाजार, तसेच शाळा व सरकारी कार्यालये असल्याने पंचक्रोशीमधील शेतकरी, नागरिक, विद्यार्थ्यांची कायम वर्दळ असते. मुख्य ठिकाणी पाच मीटर उंचीचा भुयारी मार्ग नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून महामार्गाच्या मधून चालत जावे लागते. यामुळे अपघाताची मालिका सुरू आहे. संबंधित काम न केल्यास पुन्हा तीव— आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. या वेळी राजगड पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. या वेळी ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. दरम्यान, आंदोलनामुळे सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.