पुणे

विद्युत टॉवरला लागूनच स्टोन क्रशर; लोकांच्या जीविताशी खेळ

Laxman Dhenge

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : वासुंदे (ता. दौंड) येथे उच्च दाब विद्युत टॉवरखालीच स्टोन क्रशर राजरोसपणे सुरू आहे. या क्रशरला परवानगी कशी दिली गेली? हा प्रश्न उपस्थित होत आहे. या क्रशरला मिळालेल्या परवानगीमुळे अधिकारीवर्गाच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित होत आहे. परिसरातील हजारो लोकांच्या जीविताशी हा खेळ सुरू आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, वासुंदे गावामध्ये जवळपास 40 हेक्टर क्षेत्रावर दगडाचा भुगा करणारे स्टोन क्रशर आहेत. दगडांसाठी इथे मोठमोठ्या खाणी खोदण्यात आल्या आहेत. गावचा जवळपास 100 एकरांचा परिसर या दगडांचा भुगा करणार्‍या यंत्रणा रात्रंदिवस काम करीत असल्याने आकाशात तसेच परिसरात धुळीचे लोट निर्माण होत आहे.

वासुंदे ग्रामपंचायतीने सन 2011 मधील ग्रामसभेच्या ठरावांमध्ये परिसरातील स्टोन क्रशरमधून निघणार्‍या धुळीने शेतपिकांवर मोठा थर साचून हे पीक खाण्यायोग्य नसल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे, जनावरे देखील हे पीक खात नाहीत. त्यामुळे आगामी काळात कोणालाही स्टोन क्रशरसाठी परवानगी देऊ नये, असा ठराव केला होता. या ठरावासाठी सूचक म्हणून सुरेश सर्जेराव जांभळे, तर अनुमोदक म्हणून रमेश गुलाबराव जमले यांची नावे आहेत.

दरम्यान, दौंड तहसीलमधील मंडलाधिकार्‍यांनी क्रशरला भेट दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रशरवर त्यांना कुठल्याही स्वरूपाची योग्य कागदपत्रे मिळालेली नाहीत. त्यांनी मागणी केली असता क्रशरचे मालक पुण्याला आहेत, उद्या मिळेल, अशी माहिती त्यांना तेथे देण्यात आली. या भागातील हे स्टोन क्रशर उच्च दाबाच्या वीजवाहक टॉवरला लागूनच सुरू असल्याने येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. मागील काळात याच टॉवरची एक वायर तुटून अपघात देखील घडलेला आहे, अशी माहिती नागरिकांनी दिली. गावातील काही दलालांमुळे उघडपणे विरोध करणार्‍यांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच या गावातील सन 2011 मध्ये केलेल्या ग्रामसभेच्या ठरावाला वाटाण्याच्या अक्षता कोणी लावल्या? हाच प्रश्न या गावासाठी चिंतनाचा विषय आहे.

हवेलीतील दोघांचे वासुंदेत व्यवसाय

काही स्टोन क्रशर हे ग्रामपंचायत आणि शासनातील काही अधिकार्‍यांना हाताशी धरून चालवत असल्याची माहिती आहे. दौंड तालुक्यात हा व्यवसाय करण्यासाठी हवेली तालुक्यातील दोन व्यक्तींनी मोठे पाय पसरले असून, त्यांचा हा व्यवसाय या भागातील राजकीय आशीर्वादानेच सुरू असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT