पालिकेला आता तरी मिळणार का अतिरिक्त आयुक्त? चार-चार मंत्री तरी जागा रिक्तच  Pudhari
पुणे

पालिकेला आता तरी मिळणार का अतिरिक्त आयुक्त? चार-चार मंत्री तरी जागा रिक्तच

राजकीय कुरघोडीत पालिकेला मिळेना अतिरिक्त आयुक्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुण्याला उपमुख्यमंत्रिपदासह एक नव्हे, तर तब्बल चार मंत्रिपदे मिळाली असली, तरी महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांच्या गेल्या जवळपास सहा ते आठ महिन्यांपासून रिक्त असलेल्या जागांवर अद्याप नवीन अधिकारी मिळत नाही. महायुतीमधील राजकीय कुरघोडीत अतिरिक्त आयुक्तपदांच्या नेमणुका रखडल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुणे महापालिकेत आयुक्तांसह तीन अतिरिक्त आयुक्तांच्या जागा आहेत. यामधील एक जागा महापालिकेतील पदोन्नतीने पात्र झालेल्या अधिकार्‍यासाठी आहे. मात्र, महापालिकेतील अधिकार्‍यांच्या कुरघोडीत तीनही अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त जागांवर शासनाकडून आयएएस अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली होती.

मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची बदली झाली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त म्हणून पृथ्वीराज बी. पी. यांची नेमणूक झाली. लोकसभेनंतर लगेचच अतिरिक्त रवींद्र बिनवडे यांची बदली झाली.

तेव्हापासून अतिरिक्त आयुक्तांच्या दोन्ही जागा रिक्त आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर या दोन्ही रिक्त जागांवर अधिकारी मिळतील, अशी आशा होती. मात्र, एकीकडे राज्यात आयएएस दर्जाच्या अनेक अधिकार्‍यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असतानाही महापालिकेला मात्र अतिरिक्त आयुक्त दिले जात नसल्याचे चित्र आहे.

प्रामुख्याने महायुतीमधील तीनही राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये कोणत्या अधिकार्‍यांची वर्णी लावायची यावरून मतभेद असल्यानेच या नेमणुका रखडल्या असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मर्जीतील अधिकारी आणायचे असले तरी पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवारांकडे आहे, पवारांना त्यांच्या विचारांचा अधिकारी हवा आहे.

तर महापालिका या थेट नगरविकास खात्याच्या अखत्यारित येत असल्याने यासंबंधीच्या निर्णयाचे अधिकारी नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. पुणे ही महत्त्वाची महापालिका असल्याने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाला आपल्याच मर्जीतील अधिकारी हवा असल्यानेच या वादात मात्र पुणे महापालिकेला अतिरिक्त आयुक्त मिळेनासे झाले आहेत.

एकीकडे प्रशासक राज असल्याने आधीच नागरिकांची कामे रखडत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता थेट अधिकार्‍यांची वाणवा असल्याने त्याचा थेट फटकाही पुणेकरांना सहन करावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT