मंचर : पुढारी वृत्तसेवा : लौकी (ता. आंबेगाव) येथे जमिनीच्या वादातून सावत्र भावा-बहिणींचा एकमेकांशी वाद होऊन एकमेकांस मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोन्ही बाजूंकडील एकूण आठ जणांवर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय लक्ष्मण काळे व अनिता देविदास जोरे या भावंडांनी एकमेकांविरोधात मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मंचर पोलिस ठाण्यात अनिता देविदास जोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची बहीण रंजना बाळू थोरात, संगीता देवराम शिंदे, सविंद्रा महादेव घुले, बबिता निवृत्ती इंतापे, स्वाती विक्रम गाडेकर हे सावत्र भाऊ विजय लक्ष्मण काळे यांच्या घरासमोर उभे होते.
त्यांनी विजय तुम्ही दोघे भाऊ भांडू नका, जमीन नीट करून खा आणि तुम्हाला नीट जमीन करून खाता येत नसेल, तर आम्ही बहिणी आमच्या वाट्याची जमीन करतो, असे समजावून सांगत होत्या. या वेळी विजयने चिडून फिर्यादी अनिता हिला डोक्यात दगड फेकून मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दुसर्या बाजूने विजय लक्ष्मण काळे याने फिर्याद दिली. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्या सावत्र बहिणी रंजना बाळू थोरात (रा. लौकी, ता. आंबेगाव), नकुशा बाळू जोरी (रा. येडगाव, ता. जुन्नर), सविंद्रा हुले (रा. पेठ, ता. आंबेगाव), बबिता निवृत्ती इथापे (रा. लौकी, ता. आंबेगाव), संगीता देवराम शिंदे (रा. कळंब, ता. आंबेगाव), स्वाती विक्रम गाडेकर (रा. ओतूर) आणि केतन लक्ष्मण काळे (रा. लौकी, ता. आंबेगाव) यांनी एकत्र येऊन शेताच्या बांधावर येऊन फिर्यादी विजय काळे यास 'तू येथे शेती करायची नाही,' असे म्हणत दगडाने मारहाण केली. यासह इतर सहा जणांनी शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा तपास मंचर पोलिस करीत आहेत.