पुणे : संपूर्ण राज्याला आज सोमवारी (दि. १५ सप्टेंबर) मुसळधार ते अतिवृष्टीसदृश पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात २०० तर मध्य महाराष्ट्रात १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, रविवारी (दि.१४ सप्टेंबर) मान्सूनने पूर्व राजस्थानातून परतीचे प्रस्थान ठेवले असून महाराष्ट्रातून तो २० सप्टेंबरदरम्यान जाईल, असा अंदाज शास्त्रज्ञांनी दिला आहे.
१४ सप्टेंबर रोजी राजस्थानच्या काही भागातून नैऋत्य मान्सून परतला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत राजस्थानच्या काही भागातून आणि पंजाब आणि गुजरातच्या काही भागातून नैऋत्य मान्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल झाल्याने आगामी काही दिवसांत मान्सून मध्य प्रदेश गुजरात मार्गे महाराष्ट्रात आठ ते दहा दिवसांत येईल, असा अंदाज आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांत ईशान्येकडील राज्ये आणि महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
रविवारी कोकणासह मराठवाड्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस (१०० ते १२० मि. मी.) नोंदविला गेला. तर मध्य महाराष्ट्रात ७० ते ११० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विदर्भावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे.
ऑरेंज अलर्ट: रायगड (१५), रत्नागिरी (१५), पुणे घाट (१५), सातारा घाट (१५). येलो अलर्ट पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग (१५,१६), धुळे, नंदुरबार, नाशिक (१५ ते १८), कोल्हापूर (१५), सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर (१५ ते १८), जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर (१५ ते १७), अमरावती, अकोला, नागपूर, बुलडाणा, भंडारा, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ (१५ ते १७).