पुणे : पुढारी वृत्तसेवा : सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि क्रीडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सीएफआयचे उपाध्यक्ष व संघटन सचिव प्रताप जाधव आणि मिलिंद झोडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही स्पर्धा दि. 22 ते 24 डिसेंबर दरम्यान बारामती येथे होणार आहे. या स्पर्धेमधून विजयपुर येथे दि. 1 ते 13 जानेवारी 2024 दरम्यान होणार्या 28 व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे. या स्पर्धेत युथ मुले व मुली (12 ते 14 वर्षे वयोगट), सब ज्युनिअर मुले व मुली (15 आणि 16 वर्षे वयोगट), ज्युनिअर मुले व मुली (17 आणि 18 वर्षे वयोगट), एलीट पुरुष व महिला (19 वर्ष आणि त्यापुढील वयोगट) आणि 23 वर्षाखालील पुरुष (मेन अंडर 23 वयोगट) अशा एकूण नऊ वयोगटात होतील. इंडोव्यूजल टाईम ट्रायल आणि मास स्टार्ट / रोड रेस अशा दोन प्रकारात होणा-या या स्पर्धेसाठी पुरुष-महिला आणि मुले-मुली मिळून 174 सायकलपटूनी नाव नोंदवले आहे.
संबंधित बातम्या :
या स्पर्धेतील आंतरराष्ट्रीय पदक विजेती कोल्हापूरची पुजा दानोळे, राष्ट्रीय पदक विजेती नगरची प्रणिता सोमण, नाशिकची ऋतिका गायकवाड, कोल्हापूरची रंजीता घोरपडे, बारामतीची राधिका दराडे, नवी मुंबईची स्नेहल माळी, पुणे क्रीडा प्रबोधिनीची आदिती डोंगरे, जळगावची आकांक्षा म्हेत्रे यांच्यासह पुरुषांमध्ये राष्ट्रीय पदक विजेता पिंपरी चिंचवडचा सुर्या थात्तु, पुण्याचा अदीप वाघ, प्रणव कांबळे, मुंबई शहरचा विवान सग्रु आणि नागपुरचा तेजस धांडे आदि सहभागी होणार आहेत. बारामती येथे नव्यानेच तयार झालेल्या जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर डायमेक्स कंपनी शेजारुन लिमटेक गावाच्या दिशेला जाणा-या सुमारे 7 किमी अंतराच्या मार्गावर या स्पर्धा होणार आहेत.