पुणे: शहरातील टेकड्यांवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने पुणे पोलिसांना 80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रस्तावाला हाय-पॉवर कमिटीकडून मान्यता देखील मिळाली आहे. 22 टेकड्यांसाठी हा निधी असणार आहे. पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत हे सर्व काम पूर्ण होणार असून, पहिल्या टप्प्यात 12 टेकड्यांवर प्रायोगिक तत्त्वावर हे काम सुरू होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
बोपदेव घाटातील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर शहरातील टेकड्यांच्या सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आला होता. तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील सात नव्या पोलिस ठाण्यांच्या उद्घाटनावेळी शहरातील टेकड्या व अन्य ब्लॅकस्पॉट सुरक्षित केले जावेत, त्यासाठी लागणारा वेगळा निधी देखील देण्यात येईल, असे जाहीर भाषणात सांगितले होते.
त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील संवेदनशील टेकड्या आणि ब्लॅकस्पॉट निश्चित करण्यात आले होते. त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या द़ृष्टिकोनातून कोणकोणत्या उपायोजना करण्यात याव्यात, याबाबत पाहणी करण्यात आली होती. त्यासाठी आता निधीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
...या टेकड्यांचा आहे समावेश
मिळालेल्या निधीच्या माध्यमातून टेकड्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे, आय. पी. स्पीकर, पॅनिक बटन, स्मार्ट फ्लडलाइट, इंटरनेट, या सर्वांचा एकत्रित तांत्रिक समन्वय ठेवणारी यंत्रणा ही कामे होणार आहेत. टेकड्यामध्ये हनुमान टेकडी, जुना बोगदा घाट, तळजाई, सुतारदरा, एआरएआय टेकडी, अरण्येश्वर मंदिर, बाणेर टेकडी, बोलाईमाता मंदिर, जोगेश्वरी मंदिर, वेताळबाबा टेकडी, चतु:शृंगी टेकडी, बोपदेव घाट, पारसी ग्राउंड, पर्वती, कॅनॉल रोड या टेकड्यांसह अन्य ठिकाणांचा समावेश असणार आहे.
सुरक्षिततेची अशी आहे व्यवस्था!
टेकड्या आणि निर्धारित केलेल्या ब्लॅकस्पॉटवर 600 अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यामध्ये 200 पीटीझेड (फिरते) कॅमेरे, 400 फिक्स कॅमेरे, 100 एएनपीआर कॅमेरे यांचा समावेश असणार आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगारांसाठी फेसरीडिंग कॅमेरे देखील बसविण्यात येणार आहेत. टेकड्यांसह ब्लॅकस्पॉटवर कॅमेर्यांसह पॅनिक बटन देखील असणार आहे. या भागांमध्ये टू वे पीए सिस्टिम देखील (माइक आणि स्पीकर) लावले जाणार आहेत.
रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसावे म्हणून 177 पेक्षा अधिक फ्लड लाइट्स बसविले जाणार आहेत. एकंदरीत, सिटी सर्वेलन्सचे बेस्ट फीचर्स यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
संवेदनशील ठिकाणी कमीत कमी वेळेत पोलिस पोहचावे, यासाठी 7 विशेष मोबाईल सर्वेलन्स व्हेईकल देखील तैनात करण्यात येणार आहेत. पोलिसांच्या या सातही वाहनांमध्ये ड्रोन कॅमेरे असणार आहेत.
टेकड्यांवर जेथे रेंज नाही त्या ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित राहण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे कनेक्टिव्हिटी दिली जाईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.